चोपडा : निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी बुधगाव, ता.चोपडा येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे याने काल दि.१३ रोजी झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. पंचक्रोशीतील नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून धरणाच्या कामाला गती देण्याच्या मागणीला आपला पाठिंबा दिला. उर्वेश साळुंखे या कार्यकर्त्याने निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री यांनी या विषयात लक्ष घालावे व सदर प्रश्नावर वेळ द्यावी याकरिता झाडावर बसून लाक्षणिक आंदोलन केले.
सकाळी ग्राम दैवताचे दर्शन घेवून उर्वेश साळुंखे ने आंदोलन स्थळी मार्गक्रमण केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. आंदोलन सुरू होताच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आंदोलन स्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. आंदोलक साळुंखे यास झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. मा. जि. प.सदस्य सुनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. ना.अजित पवार यांनी लवकरच मंत्रालय येथे सदर प्रश्नावर भेट देण्याचे आश्वासन दिले. डॉ. चंद्रकात बारेला, मा. चेअरमन अतुल ठाकरे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांचेसह गावातील नागरिकांनी केलेल्या विनंतीस मान देऊन दुपारी आंदोलन मागे घेत आंदोलन करणाऱ्या साळुंखे यास झाडावरून खाली उतरविले.
या अनोख्या आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनिल पाटील, देविदास देसले आदींनी अमळनेर येथून येवून आंदोलनकर्त्याची भेट घेत आंदोलनास पाठींबा दिला. स्थानिक शेतकरी संघटना, ग्रामसत्ता एक जुठ, एक मूठ, अजिंक्य क्रांती फाउंडेशन यांचेसह बुधगाव, अनवर्दे, मालखेडा, वाळकी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी यांनीही आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी रविंद्र माळी, तलाठी गजानन पाटील, कोतवाल चंद्रकांत साळुंखे, पोलीस खात्याचे प्रमोद पारधी, संजय निळे, पोलीस पाटील बापू धनगर आदी उपस्थित होते.