‘शब्द’ हे औषधीचे काम करतात तसेच घाव ही देतात : वृत्त निवेदिका दिपाली केळकर

विषयाचा सखोल अभ्यास व मांडणीतील सुसूत्रता यामुळे श्रोते मंत्रमुग्ध

अमळनेर : संवाद शब्दातूनच होतो असे नाही तर संवाद लेखनातून, कृतीतून देखील होतो. संवाद असेल तर शब्द सुचतात यासाठी वाचन व संवादाची आवश्यकता आहे. ‘शब्द’ औषधीचे काम करतात तसेच घाव ही देतात असे मत वृत्त निवेदिका, निरुपणकार सौ. दिपाली केळकर (बदलापूर) यांनी व्यक्त केले. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे ‘शब्दांच्या गावा जावे’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. जयश्रीताई पाटील तर मराठी वाड्मय मंडळाचे डॉ. अविनाश जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. श्याम पवार यांनी प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर आयोजकांतर्फे मान्यवर व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

सौ. दिपाली केळकर पुढे म्हणाल्या की, कवितांतील शब्द म्हणजे झिम्मा.. राग.. अनुराग. शब्द जपून वापरावेत. शब्दाला रंग, रुप, व्यक्तिमत्त्व असते. शब्द एक असतो मात्र कृती दोन असतात. शब्द मनाचा आरसा असतो. हे सर्व सांगताना विविध शब्दांची पेरणी करत अर्थ उलगडून सांगितला. देवाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि ते अभिव्यक्त होण्यासाठी शब्द शक्ती बहाल केली. हे संत तुकाराम यांच्या ‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने.. शब्दांचीच शस्त्रे, यत्न करु.. ‘ या ओव्यांतून सांगितले. जीवनातील पाच C पैकी.. संवाद (Comunication) कमी होत असल्याचेही नमूद केले. शब्दांचे विविध प्रकार असून यात जोडणारे, तोडणारे, दुःखद, सुखद, ईतिहास घडविणारे, बेरकी, शूर, तुच्छता दर्शक, मोह पाडणारे, खोडा घालणारे, निरर्थक, क्रिया दर्शवणारे, समुह दर्शक, वाट चुकलेले, सभ्य, असभ्य आदी प्रकार उदाहरणांसह लक्षात आणून दिले. आपण शब्दाचा उच्चार कसा करतो ? त्यावर सारं काही अवलंबून असते. त्यातून सकारात्मक वा नकारात्मक लहरी येतात. शब्दांतील ऱ्हस्व, दिर्घ, ऊकार, पद दर्शक शब्द, सांकेतिक शब्द व्याकरणाच्या माध्यमातून समजावले. आपल्याला इंग्रजी शब्द थोडेसे लवचिक वाटतात त्यामुळे आपण पटकन ते इंग्रजी शब्द वापरतो. कोणत्याही शब्दाचा अर्थ समजणे व जाणून घेणे महत्त्वाचे असते. कधी कधी शब्दाचा अनर्थ होतो. यातून भलताच प्रसंग ओढवला जातो. शब्दाचा जसा अर्थ घेतला तसा तो बदलतो याची जाणीव श्रोत्यांसह विशेष करुन प्रसार माध्यमांतील व्यक्तींना करुन दिली. विषयाचा सखोल अभ्यास व मांडणीतील सुसूत्रता यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

सौ. वसुंधरा लांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपाध्यक्ष : शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह : सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष : प्रदीप साळवे, कार्यकारिणी सदस्य : प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!