
अमळनेर : कान्हदेश म्हणजे कान्हाना देश त्याचा अपभ्रंश होऊन उत्तर महाराष्ट्राला आजही खानदेश म्हणून ओळखले जाते. तेथील अहिराणी ही एक समृद्ध बोलीभाषा आहे. तिच्यात अनेक लोकगीते, ओव्या लोककला, म्हणी असून हा सांस्कृतिक ठेवा जपणे ही आजच्या काळाची गरज आहे. खानदेशी साहित्य परंपरेचा अनमोल ठेवा अहिराणी असून अहिराणी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी प्रचार प्रसार व्हायला हवा असे मत वक्ते बापू उर्फ देविदास हटकर (ठाणे) यांनी अहिराणी भाषेतून व्यक्त केले. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे ‘खानदेश /खानदेशी साहित्यिक व अहिराणी साहित्य’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना काल दि. १६ ऑक्टोबर रोजी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक चे निवृत्त अधिकारी विजय गणेश कुडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी वाड्मय मंडळाचे डॉ. अविनाश जोशी होते. मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय बन्सीलाल भागवत यांनी करुन दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराजाचे व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर आयोजकांतर्फे मान्यवर व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
साहित्यिक बापू हटकर म्हणाले की, कान्हदेश म्हणजे कान्हाना देश त्याचा अपभ्रंश होऊन उत्तर महाराष्ट्राला आजही खानदेश म्हणून ओळखले जाते. गोवर्धन एक पर्वत त्यावरुन गोरधन, सारंग एक धनुष्य त्यावरुन सारंगखेडा अशी अनेक उदाहरणे दिली. पूर्वी मुंबई ईलाखाचे पूर्व आणि पश्चिम खानदेश असे दोन भाग होते. हा भूभाग पुढे जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला. या परिसरात बोलली जाणारी बोली सर्व जाती जमातींनी दैनंदिन व्यवहारासाठी स्विकारली आहे. खानदेश म्हणजे अहिर देश.. अहिराणी प्रदेश.. अहिराणी बोली. अहिराणी चा इतिहास पाहायचा तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांच्या साहित्यात सुद्धा अहिराणी चे असंख्य शब्द आढळतात. गोपाळ.. गुराखी.. गुरे राखणारे बाल गोपाळ म्हणून रामायण महाभारत काळापासून उल्लेख आहे. खानदेशात आढळणारी विवाह गीते इतरत्र आढळत नाही. या गीतांतून खानदेशचा अहिराणी बोलीचा इतिहास, संस्कृती, शब्दसंग्रहावर प्रकाश टाकता येतो. पुर्व इतिहासातील सत्तर टक्के घटना खानदेशातील असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना वालझिरी, रांजणगाव, मेहरुण, हरताळे आदी गावांचा अपभ्रंश कसा झाला याचे विवेचन केले. श्रावण बाळाचं मंदीर फक्त खानदेशात, वाल्मीकी, व्यास ऋषी, महाकवी कालिदास यांचा जन्म खानदेशात. वाडे येथील महालिंगदास, पारोळा येथील ह. ना. आपटे, पिंपळनेर येथील जोशी, जळगावातील ना. धो. महानोर, बहिणाबाई हे सर्व खानदेशातील असल्याचे सांगत काही अहिराणी ओव्या गाऊन अर्थ उलगडून सांगितला.
डॉ. अविनाश जोशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खानदेशातील परंपरा पुर्व इतिहास उलगडल्या बद्दल वक्त्यांचे आभार मानले. पुढील वर्षी होणारे साहित्य संमेलन सर्व मिळून यशस्वी करावे असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी. भराटे व बन्सिलाल भागवत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपाध्यक्ष : शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह : सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष : प्रदीप साळवे, कार्यकारिणी सदस्य : प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदींनी परिश्रम घेतले.
