संत नामदेव यांचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याचे फारसे मूल्यमापन झाले नाही : साहित्यिक प्रा. डॉ. रविंद्र शोभणे

शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटनप्रसंगी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष यांचा सत्कार व विशेष मुलाखत

अमळनेर : संत तुकाराम यांच्या कार्यामागे संत नामदेव यांची प्रेरणा असून तसा उल्लेख तुकोबाराय यांनी आपल्या अभंगात केलेला आहे. संत नामदेव यांचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याचे फारसे मूल्यमापन झाले नाही असे विचार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे (नागपूर) यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित शारदीय व्याख्यानमाला उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते काल बोलत होते. विशेष मुलाखतीने प्रथम पुष्प गुंफले. शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आवश्यक सूचना कराव्यात असे नम्रपणे आवाहन केले. सौ. स्नेहा एकतारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे व मुलाखतकार वि. दा. पिंगळे यांचा परिचय करुन दिला. कवी रमेश पवार लिखित सन्मान पत्राचे प्रा. श्याम  पवार यांनी वाचन केले. यानंतर प्रा. डॉ. रविंद्र शोभणे व सौ अरुणाताई शोभणे यांचा खासदार उन्मेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. शहरातील विविध संस्थांतर्फे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री राजेंद्र बडगुजर यांनी म. वा. मंडळास समई व नटराज मूर्ती भेट दिल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार स्मिताताई वाघ, जैन उद्योग समूहाचे अशोकभाऊ जैन, प्राचार्य तानसेन जगताप, डॉक्टर अनिल शिंदे, सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, अध्यक्ष केशव स्मृती प्रतिष्ठान जळगावचे भरत अमळकर, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, म. वा. मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. जैन उद्योग समूह चे अशोकभाऊ जैन यांनी आपल्या मनोगतात अमळनेर ही ऐतिहासिक भूमी असल्याने साहित्य संमेलन यशस्वी झालेच पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे आश्वासित केले.

मुलाखतकार वि. दा. पिंगळे यांनी सुरुवातीलाच ‘शब्दांच्या माध्यमातून शोभिवंत.. कर्तृत्ववान’ असा उल्लेख करत प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे अभिनंदन करुन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मुलाखत घेतली.
१. अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदा चा योग मागील वेळी गमावला होता.. आता काय वाटतं ?
— अमळनेरच्या सानेगुरुजींच्या कर्मभूमीत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं म्हणजे सुवर्णाक्षरात लिहिण्याचा योग हे माझे भाग्यच. सन २०१८ ची निवडणूक हारलो ते कदाचित यासाठीच. अमळनेरकरांचे मनःपूर्वक आभार मानले.
२. साहित्य क्षेत्राची गोडी कशी लागली ?
— लहानपणापासून घरातील वातावरण वारकरी संप्रदाय असल्याने बालपणातच संस्कार झाले. भजन, किर्तन, वाचनाची गोडी लागली. कथा, कादंबरी लिहायला लागलो. हळूहळू फुलत गेलो. नववी इयत्तेत असताना शाळेत नाटक पाहिले. शाळेत मलाही नाटकात काम मिळावे यासाठी मागे लागायचो मात्र गुरुजींनी नकार दिला. ती खंत मनात ठेवून १२ व्या वर्षी ‘वेगळं व्हायचंय मला’ हे नाटक लिहिले. त्यानंतर शाळेत ‘देवमाणूस’ नाटकात नंदिनी चे स्त्री पात्र साकारले. तो अनुभव आनंद देणारा होता.
३. ‘प्रवाह’ कादंबरीचा विषय काय होता ? त्या कादंबरीला यश का मिळाले नाही ?
— प्रवाह कादंबरीचा विषय प्रेमाचा होता. जुन्या काळात प्रेम म्हणजे पाप. विसाव्या वर्षी मानवी नातेसंबंध न कळण्याचं वय असल्याने ती कादंबरी मुळात कच्ची होती साहजिकच यश मिळाले नाही. त्याच कादंबरीचे पुनर्लेखन करुन आता परिपक्वते नंतर उशिरा प्रकाशित होत आहे.
४. ‘कोंडी’ कादंबरी गाजली याचे रहस्य काय आहे ?
— हरसूल गावातील सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी असून ग्रामीण जीवनाचा त्यात समावेश आहे. शेतात जाणाऱ्या बाईकडून गावगुंड त्रास न देता डोक्यावरची शिदोरी हिसकावून घेत.. डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्या गावगुंडांना धडा दिला गेला. हा प्रकार लिहावयास घेतला आणि कोंडी कादंबरी उदयास आली.
५. समाज माध्यमांमधील वाद.. संमेलनासाठी अध्यक्ष हा गुळाचा गणपती यावर आपले मत काय ?
— घटना दुरुस्ती नंतर निवड रद्द करुन.. सर्वांना न्याय मिळावा असा विचार समोर आला. समाजमाध्यमांत वेगळा वाद निर्माण केला जातो. माझ्या मते.. संमेलन अध्यक्ष चालता बोलता असावा. समाजाचे प्रश्न लिहिता असावा. सरकारला शिव्या देणारा असा नसावा तर योग्य तो प्रश्न मांडणारा असावा. सरकारचं शैक्षणिक धोरण या विषयावर माझा भर असेल असे स्पष्ट केले.
६. संमेलन अध्यक्ष म्हणून भाषणात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर लिहिलं बोललं पाहिजे असा आपला विषय काय असणार ?
— शिक्षण विषय महत्त्वाचा ठरेल महाराष्ट्रभर शाळांची दयनीय अवस्था झाली आहे महाराष्ट्रात शाळांची दयनीय अवस्था झाली आहे शाळांवर शासन अन्याय करीत आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी पालकांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. शिक्षकांची कमतरता आहे. अध्यक्षीय भाषणातून प्रकर्षाने शिक्षणाचा मुद्दा मांडणार आहे. वचक हा ठेवावाच लागेल. मराठी शाळा, शिक्षक नेमणूका यावर बोलावं लागणार बाकी धक्कादायक मुद्दे गुलदस्त्यात आहेत ते वेळेवर बोलू असे सांगत मराठी भाषेचा अभिजात भाषा म्हणून उल्लेख व्हायला हवा असे सांगितले.
७. संत नामदेव साहित्यावर समिक्षा करायची ईच्छा आहे का ?
— सर्व संतांचा नितांत आदर आहे. संतांना जाती जातीत विभागून घेतले आहे. संत नामदेव म्हणजे उन्नत व्यक्तीमत्व. त्यांचे काम मोठे असून त्यांच्या कामाचे फारसे मूल्यमापन झालेले नाही अशी खंत व्यक्त केली. संत तुकाराम यांच्या मागे संत नामदेव यांची प्रेरणा असून तसा उल्लेख तुकोबाराय यांनी आपल्या अभंगात केलेला असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सोनवणे व सौ. स्नेहा एकतारे यांनी केले. वेळेचे भान राखत मुलाखतकार यांनी कार्यक्रम आटोपता घेतला. सौ. स्नेहा एकतारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपाध्यक्ष : शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह : सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष : प्रदीप साळवे, कार्यकारणी सदस्य : प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!