अमळनेरात फोफावणाऱ्या गुंडगिरीला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास भेटणार : आ. अनिल पाटील

अमळनेर : येथील नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी गायकवाड यांचेवर चाकू हल्ला झाल्याचे समजताच पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवत हल्लेखोर पकडले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, शहरात दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विविध व्यक्ती व संघटनांकडून पालिकेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचेवर शनिवारी झालेल्या चाकू हल्ल्याचा जाहीर निषेध केला जात आहे.
तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अनिल भाईदास पाटील यांनी गायकवाड यांचेवर ता.२ रोजी झालेल्या हल्ल्याशिवाय त्याच दिवशी धुळे अमळनेर रोडवरील वणी गावाजवळ झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हायला हवी. गेल्या पाच वर्षात शहरात गुंडगिरी फोफावली असल्याचे म्हटले आहे. शहर व तालुक्यातील अवैध धंदे व गुंडगिरीला रोखण्यासाठी स्थानिक व जिल्हा पोलीस प्रशासनाशी आमदार पाटील चर्चा करणार आहेत.
न.पा. कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज… उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

अमळनेर न.पा. मजदूर संघाने आज ता. ४ रोजी काळ्या फिती लावून कामकाज करीत हल्ल्याचा निषेध नोंदविला. शहरात फोफावणाऱ्या गुंडगिरीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात काळ्या धंद्याविरोधात चालविलेले आंदोलन लोकप्रतिनिधींनी यापुढे चालू ठेवावे असे आवाहन न.पा.महासंघाचे नाशिक प्रदेश जनरल सेक्रेटरी संघटनेचे रामभाऊ संदानशिव यांनी केले आहे.
हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनावर राष्ट्रीय न.पा. मजदूर महासंघाचे जनरल सेक्रेटरी रामभाऊ संदानशिव, भारतीय कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी सोमचंद संदानशिव यांच्या सह्या आहेत. निवेदन देतांना संजय चौधरी, युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, राधा नेतले, प्रशांत ठाकूर, शेखर देशमुख, साजिद पठाण, इकबाल पठाण, महाजन, बापू शिंगाने, नितीन खैरनार, फारूक, गणेश पाटील, भास्कर मगरे, सतीश बडगुजर, मदन पाटील, प्रवीण शेलकर, विजय पाटील, मधुसूदन पाटील,सुधाकर महाजन, अरुणा बहारे, ईश्वर पाटील, संजय सोनवणे आदी कर्मचारी वर्ग हजर होते.
माजी सैनिक संघटनेकडूून निषेध…
संदीप गायकवाड हे माजी सैनिक असून निवृत्तीनंतर एमपीएससी परिक्षेत पास होवून उप मुख्याधिकारी पदावर विराजमान झाले आहेत. अमळनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष व माजी सैनिकांनीदेखील या घटनेचा तिव्र निषेध नोंदवून हल्लेखोरांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.