शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोल ताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने दिंडी संमेलन स्थळी

फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले ग्रंथ दिंडीचे स्वागत

अमळनेर (सानेगुरूजी साहित्य नगरी) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांचेसह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता. सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीस सुरुवात झाली. यावेळी अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचेसह हजारो सारस्वतांच्या गर्दीने शहर फुलले होते. दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. ग्रंथदिंडीच्या मार्गावर पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मान्यवरांच्या हस्ते दिंडी मार्गावरील थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

केशव शंखनाद पथक- पुणे, बंजारा समाज पारंपरिक नृत्य- चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक- जामनेर, ढोल ताशा पथक, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्थानिक शाळांमधून गंगाराम सखाराम शाळा, द्रो. रा. कन्या शाळा, प्रताप हायस्कूल, स्वामी विवेकानंद शाळा, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा, साने गुरूजी शाळा, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी, मराठी वाड:मंय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा, पोलीस प्रशासन, प्रांताअधिकारी, महराष्ट्र मतदान विभाग, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचे माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, महात्मा फुले हायस्कूल देवगाव देवळी, गडखांब माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय यांचा सहभाग होता. खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!