मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही : संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे

उपस्थित मंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस; विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या

अमळनेर (पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही असून एकीकडे मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे ? असा प्रश्न ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला आहे. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वागताध्यक्ष तथा ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, संमेलनाचे महाव्यवस्थाप्रमुख बजरंगलाल अग्रवाल, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे, सचिव राजेंद्र भामरे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक, कोषाध्यक्ष नीरज अग्रवाल, अखिल भारतीय महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ.दादा गोरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा.किरण सगर, प्रा.मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, डॉ.गजानन नागरे, पुरुषोत्तम सप्रे, डॉ.विद्या देवधर, कपूर वासनिक, जयंत कुळकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.रमेश माने यांनी लिहिलेल्या व उत्तराताई केळकर आणि डॉ.अमोघ जोशी यांनी गायिलेल्या ‌‘माय मराठी नित्य लाविते टिळा’ व नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ गीताने संमेलनाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रा. डॉ. रवींद्र शोभणे पुढे म्हणाले, साहित्याने काळासोबत चालावे, असे म्हटले जाते. अर्थात यात दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे अगदी समकालीन, वर्तमानकालीन, वर्तमानकालीन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा, वर्तमानाचा विचार न करता, मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन. अर्थात समकालाचे, वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत, असे कुणीही समजू नये. पण काही लेखक समाजातील बदलांकडे पूर्णत: पाठ फिरवून लेखन करतात. अर्थात अशा प्रकारचे लेखन कमअस्सल असते, असेही मानता येणार नाही. झंमराठी साहित्यात नव्या, ताज्या विषयांना मराठी नाटकांनी अधिक प्राधान्याने रसिकांसमोर आणले. यात अनिल बर्वे हा नाटककार, कादंबरीकार अग्रेसर होता.

साठोत्तरी प्रवाह : नव्या वाटा…
मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्याचा मोठा प्रवाह वेगाने आला आणि संपूर्ण जाणकार वाचकांचे, रसिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. युगानुयुगांपासूनची ठसठसती वेदना, दु:ख त्या साहित्यातून व्यक्त होऊ लागले. त्यात व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने इथल्या पारंपरिक मूल्यांना जबरदस्त हादरे देत हे साहित्य एका दशकाच्या आतच प्रस्थापित झाले. या साहित्याचा अमोघ वेग आणि जीवनानुभव पाहता श्रेष्ठ, भारतीय पातळीवरची महाकादंबरी दलित साहित्यातूनच जन्माला येईल, असा विश्वास अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. पण जवळजवळ ५० वर्षे उलटूनही या अपेक्षा मात्र त्या साहित्याने पूर्ण केल्या नाहीत, असे तटस्थपणे विचार करता म्हणावे लागते. काही लक्षवेधी कादंबऱ्या नक्कीच या साहित्याने दिल्या. त्या सगळ्यांचा आदराचा विषयही ठरला.

भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न महत्त्वाचे…
जागतिकीकरणाने मराठी भाषासुद्धा शिल्लक राहील की नाही, अशी भीती वर्तविली जाते. या जागतिकीकरणाने जगाच्या पाठीवरील किती बोली संपल्या आणि किती बोली संपायच्या मार्गावर आहेत, याची मोजदाद भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या देशीवादाच्या निबंधात केली आहे. व्यवहाराची भाषा अणि बोलण्याची वेगळी बोली अशी आपल्या बहुतेक समाजाची स्थिती आहे. व्यवहाराच्या भाषेसोबतच उपजीविकेची भाषा अशीही वर्गवारी करावी लागेल. जागतिक बाजारपेठेत तुम्हाला ती भाषा वापरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात. जागतिकीकरण आल्यामुळे खरंच आपल्या भाषा संपणार आहेत का ? यावर विचार होणे गरजचे आहे.

काही अपवाद सोडला तर बहुतेक मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत. काही आहेत तर त्यात कथा, कविता छापणे बंद झाले आहे. आता कथा-कविता कोण वाचतं ? म्हणून वृत्तपत्रांचे मालक प्रश्न विचारतात. बालविभाग बहुतेक बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयात एकांकिका, नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत. तेथे पाश्चात्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते. ग्रंथालयांची स्थिती आणखीच वाईट आहे. याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची, संस्कृतीची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते, असेही प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी स्पष्ट केले.

स्वागताध्यक्ष ना. गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, सानेगुरुजी अमर रहे घोषणा देत साने गुरुजींच्या कर्मभूमीला नमन केले. ते म्हणाले की, साने गुरुजींच्या जीवनाला अमळनेरातूनच कलाटणी मिळाली ७२ वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे, ही सर्व जळगाव वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जळगाव जिल्ह्याबरोबरच अमळनेर तालुक्याला साहित्याची परंपरा आहे. भाषा, साहित्य, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीला वाहिलेल्या खान्देशची महती सांगितली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे म्हणाल्या की, संस्थांच काम केलं की लेखन मागे पडते. व्यासपीठावर आहेत ते साहित्यिकच आहेत.

संमेलनाचे निमंत्रक नामदार अनिल पाटील म्हणाले की, आमचा अमळनेर हा अवर्षणग्रस्त तालुका असताना महामंडळाने साहित्य संमेलन घेण्याचा मान दिला. ही संतांची भूमी आहे, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे. जगात पोहोचलेल्या विप्रो कंपनीचे अजिज प्रेमजी, श्रीमंत प्रतापशेठजी यांना विसरुन चालणार नाही. शेतीवर अवलंबून असल्याने ज्ञानाचा उपयोग शेतीसाठी व्हावा अशी अपेक्षा. कष्टकऱ्यांना या संमेलनातून पाझर फुटावा, अशी अपेक्षाही साहित्यिकांकडून व्यक्त केली.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी, सर्वांची नावे न घेता ‌‘सभी मेरे अपने’ म्हणत भाषणाची सुरुवात केली. साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी आले पाहिजे. साहित्यातून विचार पेरले जातात. राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. उत्तम साहित्य हे चांगला विचार देते, यासाठी ग्रंथवाचन केले पाहिजे, असे आग्रही विचार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. खान्देशातील मातीला कर्तृत्वाचा सुगंध आहे. पूज्य साने गुरुजी, ना.धों. महानोर यांच्यासारखे कर्तृत्ववान माणसं लाभले आहेत असेही सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.

भाषा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले की, जसे LIC ची ज्योत म्हणजे साहित्य आणि हात संरक्षण. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत दररोज एक तास वाचनावर भर दिला आहे. जगात मराठी बांधवांना मराठी ची पुस्तके देऊन वाचन चळवळीचे वेगळं धोरण राबविले जाईल. ५० कोटींची तरतूद होणार. साहित्य मंडळांची भूमिका महत्त्वाची असेल. शासनाची ढवळाढवळ नसेल. मराठी भाषा धोरण महिनाभरात जाहीर करणार आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना जगभरातील पालक त्या-त्या ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना दररोज एक तास पाठवतात. महाराष्ट्राबाहेरही बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांना २५ लाख रुपये निधी देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‌मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. मराठी युवक मंडळे स्थापन करुन १० हजार अनुदान दिले जाणार. मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये अनुदानही देण्यात येईल. मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या कळवा, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वांच्या श्रमातून संमेलन. राजकारणात विकास होत असताना साहित्य, कला, संस्कृती जोपासण्यासाठी काम झाले पाहिजे. त्यात हस्तक्षेप नसावा. सानेगुरुजी, शाहीर साबळें चा नामोल्लेख केला. खानदेशातील साहित्यिकांची नावे सभामंडपाला हा मोठा गौरव म्हणावा लागेल. साहित्यिक, पत्रकार यांनी निष्पक्ष मत मांडले पाहिजे. ती खरी गरज आहे. अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे. मात्र वाचन संस्कृती टिकली पाहिजे. कारण त्याची गरज आहे, असे विचार व्यक्त केले. ९७ व्या साहित्य संमेलनाला डिजिटल टच देण्यात आला आहे. ‌‘चॅटबॉट’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर यात खुबीने करण्यात आला आहे, अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. साने गुरुजी अमळनेर येथील ज्या तत्त्वज्ञान केंद्रात शिकले, असे तत्त्वज्ञान केंद्र राज्यात क्वचितच दिसेल. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा यांचे काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडायचे आहे. साने गुरुजींचे अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात वास्तव्य होते. साने गुरुजींच्या नावाला साजेसे असे स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार निधी देईल, यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.

कार्यक्रमास जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ.भरतदादा अमळकर आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे सहसचिव डिगंबर महाले व मृण्ययी भजक यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला मेहेंदळे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!