खवशी गावात अशी पहिलीच घटना, गाव शोकसागरात बुडाला

अमळनेर : तालुक्यातील खवशी बुद्रुक येथील रहिवासी सुरेश धुडकू भिल यांचा मुलगा स्व. सुनिल सुरेश सोनवणे सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) मध्ये कार्यरत असताना मणिपूर हुन सुट्टीवर येत असताना काळाने घात केला. दि. १४ फेब्रुवारी रोजी नागालँड मधील दीमापूर येथे जवान सुनिल चे निधन झाले. दुसऱ्या दिवशी सदर वार्ता गावात कळाल्यावर गाव शोकसागरात बुडाले. दिनांक १६ फेब्रुवारी रोजी दुपारी जवानाचा पार्थिव देह मूळ गावी खवशी येथे कुटुंबियांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) जवानांची टीम दुपारी गावात पार्थिव देह घेऊन आल्यानंतर आप्तेष्ट नातेवाईक, गावातील महिला, पुरुषांनी त्यांचे निवासस्थानी एकच गर्दी केली होती. यावेळी कुटुंबियांनी आक्रोश केला. उपस्थितांचेही डोळे पाणावले.

नागालँड मधील दीमापूर येथून दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ०५ मिनिटांनी पार्थिव विमानाने गुवाहाटी येथे व त्यानंतर गुवाहाटी ते मुंबई, मुंबई ते औरंगाबाद येथे विमानाने व औरंगाबाद येथून सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) बटालियन प्रमुख कुशल सिंग यांच्या देखरेखीखाली आपल्या ताफ्यासह शासकीय वाहनाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी दुपारी जवानाच्या मूळ खवशी गावी आणण्यात आले. गावात मुख्य चौकासह ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. भावपूर्ण श्रद्धांजली चे बॅनर ही लावण्यात आलेले होते. सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) जवानांनी पार्थिव देह खांद्यावर घेतला होता. भारतीय ध्वज दिमाखात फडकत असलेल्या एका सजवलेल्या ट्रॅक्टर वर पार्थिव ठेवून गल्लीतून स्मशानभूमीत नेण्यात आले. देशभक्तीपर गीतांसह भारत माता की जय, वंदेमातरम, वीर जवान अमर रहे, जय जवान जय किसान आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. सर्व गावकऱ्यांनी देशाभिमान दाखवून दिला. स्व. जवान सुनिलला अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील पुरुष, महिला, युवक, युवती, आप्तेष्ट नातेवाईक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे असंख्य महिलांनी थेट उपस्थिती देऊन जवान सुनिलला अखेरचा निरोप दिला. दुपारी पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व. जवान सुनिल सोनवणे यांनी वीस वर्ष देशाची सेवा केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

यावेळी खान्देश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी, ईश्वर चौधरी, नितिन पारधी, शेखर देशमुख व रक्षक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक संघटना यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. गावातील सीआरपीएफचे निवृत्त मेजर नरेंद्र सूर्यवंशी, ग्रामपंचायत सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व नागरिकांनी सहकार्य केले.