जळगावच्या परिवर्तन संस्थेच्या रंगकर्मींचे सादरीकरण
शिक्षा, न्याय व्यवस्था, समानतेच्या गप्पांवर केला प्रहार
अमळनेर : येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे जुना टाऊन हॉल येथे महिला दिनाच्या पूर्व संध्येला कवी, लेखक, जे. जे. आर्टचे कुंचलाकार अरुण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या ‘भिजकी वही’ अभिवाचनाचा प्रयोग पार पडला. जळगावातील परिवर्तन संस्थेच्या कलाकारांनी प्रयोग सादर केला. रंगकर्मी शंभू पाटील यांच्या बहारदार शैलीत अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमातून महिला जीवनाची व्यथा मांडण्यात आली. अरुण कोल्हटकर यांच्या भिजकी वही’ कविता संग्रहात अश्रूंच्या कविता असून महिलांच्या जीवनाचे सूक्ष्म वर्णन यात केले आहे.
सुरुवातीलाच मंद प्रकाशात ‘कोणीतरी रडतंय’ कवितेतील ‘तू का रडते आहेस एकटीच इथं या अरण्यात बसून , की तूच हे अरण्य आहेस रडणारं’ या ओळी रसिकांच्या मनास भेदून गेल्या. यात स्त्रीच्या दुःखाची शब्दातून विचारणा दिसून येते. ‘अपाला’ ही कविता वेदातल्या कोड झालेल्या बाईवरची आहे. दासी म्हणून विकली गेलेली बसऱ्याची रबिया ही सुफी संत आहे. बाई म्हणजे अपार वेदना. सगळ्यांना अपार अश्रू ढाळावे लागले. लैला व मजनु मधील मजनुच्या पुरुषप्रधान चरित्राला वाढविले. परंतु निरपेक्ष प्रेम करणारा कैस महंमद दिसला नाही. महिलेला बदनाम करणारी पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीला कसे बदनाम करते ? प्रेम सांगणारा धर्म स्वतःच्या धर्मासाठी रक्ताची रांगोळी करतो. धर्माला मानवतेचा अर्थ समजला नाही. महिलांवर आजही बलात्कार होतात. मेरी येशूच्या प्रेमासाठी आतूर पण येशू तिला प्रेम देऊ शकला नाही. हे सगळे अश्रू भिजक्या वहीत कवीने कैद केले आहेत.
तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या जातात तरी त्यांचा अंश उरतोच. तसंच कवी कोल्हटकर म्हणतात की, माझी कवितेची वही भिजून नष्ट होवो, पण अंश म्हशीच्या दुधात सापडो. यातून कोल्हटकर आणि तुकारामांमध्ये क्षणभर साम्य दिसू लागतं. विठोबाची अन् आपली थेट ओळख नसून, आपली ओळख आहे तुकारामांशी. तुकाराम विठोबाला ओळखत होता ही वस्तुस्थिती सांगितली आहे. ‘भिजकी वही’चे अभिवाचन कार्यक्रमात शंभू पाटील, अपूर्वा पाटील, नेहा पवार, सुदीप्ता सरकार, हर्षल पाटील, सोनाली पाटील, मंजुषा भिडे, अंजली पाटील, मोना निंबाळकर यांनी केले. प्रकाश योजना- राहुल निंबाळकर, नेपथ्य- प्रवीण पाटील, वेशभूषा- पल्लवी सोनवणे यांनी आपापली भूमिका निभावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.