
अमळनेर : लोकन्युज यूट्यूब चॅनेलचे संचालक संभाजी देवरे यांनी ता.२५ ऑक्टोबर रोजी शिंदखेडा विधानसभा निवडणूकीचे वृत्त प्रसारित केले होते. यामुळे त्या मतदार संघातील पराभूत उमेदवार संदीप बेडसे यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास संभाजी देवरे यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क करून अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही व्हावी या अनुषंगाने येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय गाढे, कार्याध्यक्ष संजय मरसाळे, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत वानखेडे, उपाध्यक्ष अरुण पवार, सचिव अजय भामरे, सहसचिव गौतम बिऱ्हाडे, खजिनदार सुरेश कांबळे, समाधान मैराळे, कमलेश वानखेडे, मिलिंद निकम आदी उपस्थित होते.