देशसेवा करणाऱ्या सैनिक परिवाराला सुरक्षा मिळावी व गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा अशीही विनंती
अमळनेर : येथील पालिकेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचेवर ता.२ रोजी धुळे अमळनेर रोडवर झालेल्या चाकू हल्ल्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हायला हवी याकरिता अमळनेर तालुका माजी सैनिक संघातर्फे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपासून खास करुन माजी सैनिक व सैनिक यांची घरफोडी व मोटार सायकल चोरीत वाढ झाली आहे. यामुळे सैनिकांच्या कुटुंबियांना मानसिक व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशसेवा करणाऱ्या सैनिक परिवाराला सुरक्षा मिळावी व गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. चाकू हल्ल्यातील गुन्हेगारांना जेरबंद केल्यामुळे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी निवृत्त सुभेदार मेजर अध्यक्ष बळीराम वानखेडे व सैनिक सहकारी हजर होते.