महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोठं प्राबल्य असल्याने विधानसभा तिकीटावर आमचाच अधिकार; युवकांनी केला पक्ष प्रवेश

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बैठकीत सूर

अमळनेर : विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेेर मतदार संघातून काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागण्याची तयारी केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट देखील आपला उमेदवार असावा यासाठी तयारीला लागला आहे. गेली दोन पंचवार्षिक निवडणुकीतील अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कृषीभूषण साहेबराव पाटील व अनिल भाईदास पाटील विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेले यश पाहता, जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. साहजिकच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट घटक पक्षांतील सर्वात मोठा प्राबल्य असलेला पक्ष आहे. घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस दावेदार असल्याने आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे आम्ही अमळनेेर विधानसभा निवडणुकीत तिकीटाची मागणी करणार आहोत. तो आमचा अधिकार आहे. हे सर्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी सांगितले. येथील नांदेडकर सभागृहात अमळनेेर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न झाली त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी काही युवकांनी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत यापुढे शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या भावना व्यक्त केल्या.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे मोठा अनुभव आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांच्या मागे उभे राहून आपल्या पक्षाला यश मिळावं अशीच जनतेची इच्छा आहे. यामुळे शरदचंद्र पवार गट तयारीला लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडून आणणे हेच पक्षाचे उद्दिष्ट आहे. आपल्या पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली, स्वतःचं घर फोडलं.. ते काय राज्य चालवणार ? असा टोला डॉ. बी. एस. पाटील यांनी विरोधकांना लगावला. येणारी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी पक्षाच्या सौ. तिलोत्तमा पाटील, सचिन पाटील, ग्रंथालय सेलचे उमेश दादा, नवा चेहरा म्हणून प्रशांत निकम इच्छुक आहेत. सोबत स्वतः माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील देखील तयारीत असल्याचे चित्र आहे.

पत्रकार परिषदेत विकासकामांवर टिकेची झोड…

अमळनेर तालुक्यात कोण आमदार, कोण मंत्री आहे ? काय काय घोषणा केल्या ? कोणी काय कामे केली ? ही जुमलेबाजी आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. निवडणुकीत फार मोठ्या घोषणा केल्या जातात. प्रशासकीय मान्यता म्हणजे काय असते ? एखाद्या मंजूर गोष्टीची किंमत वाढल्यानंतर त्यासाठी पुन्हा मंजुरी घेणे यालाच प्रशासकीय मान्यता म्हणतात. अशा गोष्टीचा बाऊ करण्याची गरज नाही. तीनवेळा प्रशासकीय मान्यता मिळूनही पाडळसे धरण पूर्ण झाले नाही. महाराष्ट्र काय, कुठेही जाऊन विचाराल तर आहे तो आमदार आता चालणार नाही अशीच चर्चा आहे असे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी सांगितले.

बाजार समितीत सभापती निवड असताना मंत्र्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना फसविले. एकही आमसभा घेतली नाही. अवैध धंदे सुरुच आहेत. तालुक्यात आमदार वा मंत्र्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या, त्यातील किती घोषणा अंमलात आणल्या गेल्या ? धरणात किती टीएमसी पाणी साठले ? अशा गोष्टी पत्रकारांनी शोध पत्रकारितेतून खात्री करुन जनतेपुढे आणाव्यात. ‘दूध का दूध.. पानी का पानी…’ सिध्द करावं. अमळनेर नगरपालिकेवर ७० ते ८० कोटी रुपयांचा बोजा असताना अन्य खर्च कशासाठी ? जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांना जास्त निधी मंजूर होतो मात्र आपल्या तालुक्यात फक्त २२ कोटी मिळतात. त्यातील सुमारे ८ कोटी माजी आमदार यांनी मंजूर केल्याची चर्चा सुरु आहे असे सचिन बाळू पाटील यांनी सांगितले.

अमळनेर नगरपालिकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत. शहरात ढेकू रोड, पिंपळे रोड सारख्या अनेक परिसरात नागरी वस्त्यांमध्ये सुमारे ३५-४० वर्षांपासून चांगले रस्ते नसताना नगरपालिका प्रशासन नगरपालिकेचा संबंध नसलेल्या खाजगी भांडवलदारांच्या जागेत कॉक्रीट रस्ते कसे काय बनवून देते ? काही प्रवर्गाच्या लाभासाठी मंत्री काम करतात की काय ? याचे गौडबंगाल नेमके काय ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यावर पत्रकारांनी अशी काही नावे सांगा म्हटल्यावर त्याबाबत संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत, वेळ आल्यावर सर्वांपुढे आणूच. तत्पूर्वी पत्रकारांनीही शोध घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. एका प्रश्नावर बोलताना आमदारांनी तालुक्यातील चुटे भुठे असा उपरोधिक शब्द वापरला होता. यावर होय.. आम्ही आहोत चुटे भुठे. पण.. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी दिला.

दादा… अगर है कौन तूम ? आपले स्वागतच.

साहेबराव दादांना शरद पवार साहेबांनी तिकीट दिल्यास आपली भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर.. साहेबराव दादांनी अजून कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही तसे काही असेल तर ते कळेलंच. ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत ? हे कोणालाच माहीत नाही. त्यांचेबाबत अगर है कौन तूम…? असेच म्हणावे लागेल. याबाबत त्यांनाच विचारा. पवार साहेबांनी दादांना पक्षात सामील केले तर स्वागतच आहे. साहेबराव दादांना आमचा विरोध असण्याचे कारण नाही. पवार साहेबांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिलीच तर आम्ही तन, मन, धनाने त्यांचाही प्रचार करु. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही हवे तेवढे प्रयत्न करु. यावेळी ग्रामीण व शहर पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!