सोमवार, दिनांक ५ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार; प्रदेशाध्यक्ष कोण होईल ? याची सर्वांना उत्सुकता

मुंबई (प्रतिनिधी) : व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड निवडणुकीच्या माध्यमातून होईल असे जाहीर करण्यात आले होते. रविवार, दिनांक २८ जुलै २०२४ ही मतदान तारीख निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली होती. त्यानुसार रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत गुप्त पद्धतीने ई मेल द्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून राज्यातील साप्ताहिक विभागातील सदस्यांचा समावेश होता. यात सुमारे ८० टक्के मतदारांनी आपला सहभाग नोंदविला. राज्यभरातील साप्ताहिक विभागातील सर्वांचा जबरदस्त उत्साह व सहभाग दिसून आला.

व्हाईस ऑफ मीडिया – साप्ताहिक विंग च्या या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी वामन पाठक – लातूर, रोहित जाधव – सांगली, अब्दुल कय्यूम – छत्रपती संभाजी नगर, आणि विकास बागडी – जालना यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. गेल्या महिनाभरापासून होणाऱ्या या निवडणूकीची चर्चा रंगत असताना आपलीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवड व्हावी यासाठी चौघांनीही आपली शक्ती पणाला लावली आहे. प्रत्येक उमेदवाराने मतदारापर्यंत पोहोचून आपली भूमिका सांगितली.
दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी निकाल जाहीर होणार..
प्रदेशाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत चारही उमेदवारांचे भवितव्य मेलबंद झाले असल्याने प्रदेशाध्यक्ष कोण होईल ? याची सर्वांना उत्सुकता लागून आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठीची निवड पाच ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार कलकोरी आणि निवडणूक अधिकारी म्हणून योगेंद्र दोरकर यांनी काम पाहिले.