
अमळनेर : शब्दाला आपलं करून शब्दाला वाचा देणारं, शब्दांची खाण, शब्दांची जाण आणि बहुजन समाजातील संघर्षाची धगधगती आग आणि वास्तव जीवनातील सत्य घटनांवर आधारित अण्णा भाऊ साठे यांनी कथा आणि कादंबऱ्यांचे लेखन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील नायकाला लढा मान्य होता रडगाणे नाही. त्यांच्या साहित्यातील नायक हा दलित, शोषित, वंचित समाजाचा आहे. परंतु, स्वाभिमानाने जगणारा आहे. असेच आजचे विद्यार्थ्यांनी स्वाभिमानाने जगणं गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर करावा, सध्या वाचन संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी पुस्तकांचे वाचन करा, मिळालेल्या संधीचे सोने करा असे विचार जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी. एस पाटील यांनी व्यक्त केले. ते देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत ‘महापुरुषांच्या विचारांचा प्रचार’ कार्यक्रमासाठी आयोजित कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. विचार पिठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी गायत्री परिवाराचे राजमल बोरसे, अरविंद सोनटक्के, एस. के. महाजन, एच. ओ. माळी होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन यांनी केले.

अध्यक्षीय भाषणातून विचार मांडताना मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत व लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले असल्याचे सांगितले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अर्पिता बोरसे, तनुश्री सोनवणे, अश्विनी माळी, प्रीती पाटील, श्रेया पाटील, जयश्री पाटील, कृष्णा पाटील तसेच गायत्री परिवाराची राजमल बोरसे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. इयत्ता आठवीचा विद्यार्थी यश पाटील याने अण्णाभाऊ साठे यांची उभेउभ चित्र साकारले होते. कार्यक्रमाचे वक्ते पी. एस. पाटील व राजमल बोरसे यांनी दोनशे रूपये बक्षीस देऊन त्याचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ईश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच. ओ. माळी, एस. के. महाजन, अरविंद सोनटक्के, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाची होतेय प्रशंसा…
युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महापुरुषांच्या विचारांचा प्रचार करत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने २०१ वक्ते अमळनेर, पारोळा ,धरणगाव तालुक्यात ५० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.. त्यासाठी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, मार्गदर्शक प्रा.डॉ लिलाधर पाटील, प्रा राहुल निकम, डी. ए पाटील, बापूराव ठाकरे आदींसह अनेक पदाधिकारी मेहनत घेत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक समविचारी संघटनांनी अभिनंदन केले आहे.
