पीबीए इंग्लिश स्कूल, अमळनेेर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

अमळनेर : शाळांमध्ये वर्षानुवर्षे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात येते पण साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून सुपरिचित असलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वर्गाला फारसे माहित नाही. अण्णाभाऊ साठे यांनी वास्तव जीवनावर स्वनिर्मित साहित्यातून दु:खी, शोषितांच्या व्यथा मांडल्या असे मत युवा कल्याण प्रतिष्ठानचे समन्वयक तथा मुख्य वक्ते दयाराम पाटील यांनी व्यक्त केले. ते पीबीए इंग्लिश स्कूल, अमळनेेर येथे झालेल्या बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे होते. सोबत विचार मंचावर ज्येष्ठ पत्रकार तथा व्हाईस ऑफ मिडिया – साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, शाळेच्या पर्यवेक्षिका एम. एस. बारी, शिक्षिका सौ. व्ही. पी. बडवे उपस्थित होते. सुरुवातीला लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत युवा कल्याण प्रतिष्ठान राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, जनसामान्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक सांगितले जातात पण.. अण्णाभाऊ साठे यांचे महान कार्य विद्यार्थी व जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जात नाही. त्यांच्या महान कार्याची दखल शासन दरबारी घेतली गेली नाही ही खरी शोकांतिका आहे. निरक्षर अण्णाभाऊंनी अनुभवाच्या बळावर साक्षर झाले. शोषितांच्या व नजरेच्या आड असणाऱ्यांच्या व्यथा साहित्यातून मांडल्या. अण्णाभाऊ साठे यांनी स्वनिर्मित असं वास्तव साहित्य लेखन करुन सर्वसामान्यांना जगण्याचं बळ दिले. वाचनाची सवय लाऊन घ्या, थोरांचे विचार समजावून घ्या व वक्ता बना असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.
मार्गदर्शन करताना डी. ए. पाटील पुढे म्हणाले की, फक्त दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ अनुभवाच्या बळावर साक्षर झाले. त्यांनी स्वनिर्मित ९७ साहित्यकृती निर्माण केल्या. लोककलेतून प्रबोधन केले. भारतात नव्हे तर रशियात देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. फकिरा व वैजयंता ची भूमिका समजावून सांगितली. त्यांचे लेखन साहित्य, चित्रपट व योगदानाबद्दल विस्तृत माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी थोरांचे विचार वाचून ते आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वंजारी यांनी केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक सौ. व्ही. पी. बडवे, श्रावण पाटील, व्ही. जी. बोरोले, सौ सुवर्णा भावसार, श्वेता पवार, सौ.शिरसाठ आदींनी परिश्रम घेतले.
