अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

अमळनेर : तालुक्याची नव्हे तर महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, ज्यांनी विधानसभेत अमळनेरचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले असे माजी आमदार म्हणून साथी गुलाब बापू यांची ओळख आहे. पूर्व व पश्चिम खानदेश शिंगाड्यावाला शेतकरी नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. विविध अंगाने जनतेच्या मनात आपला वेगळा ठसा उमटवून घर केलेले, राजकारणात खळबळ उडवणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्यालय बापूंच्या विविध गुणांना पुढील पिढी सोबत जोडण्यासाठी दरवर्षी गुलाबराव पाटील स्मृती समारोहाचे आयोजन करणार आहे. त्याचाच भाग म्हणून साने गुरुजी विद्यालयात माजी आमदार आणि शेतकरी नेते साथी गुलाबराव पाटील यांचा दिनांक २२ ते २४ ऑगस्ट २०२४ या काळात स्मृती समारोह साजरा करण्यात येणार असल्याचे अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, विलास चौधरी उपस्थित होते.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमात विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला पुरस्कार वितरण, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेचे विषयांमध्ये १) आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची, २) समाजवाद – काल, आज, उद्या ३) बोल की लब, आजाद है तेरे ४) भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य ५) खरा तो एकची धर्म या पाच विषयांचा समावेश आहे. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कारांमध्ये रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम रुपये ११ हजार, द्वितीय रुपये ९ हजार, तृतीय रुपये ७ हजार तर उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी २ हजार रुपये पुरस्कार रक्कम असेल. स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक पुरस्कार निवड समिती, राजकीय (पुरोगामी) निवड समिती, राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजन समिती, साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह आयोजन समिती गठीत करण्यात आल्या आहेत सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून बापूंच्या विचारांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने विचार पेरणीला ऐकण्यासाठी समाजातील विविध घटकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले आहे. यावेळी पत्रकार बांधव, सानेगुरुजी शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
