सभोवताली माणसांची गर्दी आहे पण दर्दी कमी, खूप पाय आहेत पण वंदनीय चरण कमी : डॉ. डिगंबर महाले

अमळनेर : येथील स्वरसुमन फाउंडेशन तर्फे बजरंग पॅलेस हॉलमध्ये रविवार, दिनांक २८ जुलै रोजी गुरुवर्य स्वर्गीय नागनाथ नेरळकर यांना समर्पित ‘माझा भाव तुझे चरणी’ गुरुपौर्णिमा समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. स्वरसुमन फाउंडेशन चे सचिव डॉ. अविनाश जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करताना समाजातील प्रत्येक माणूस हा कोणाचा ना कोणाचा गुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रथम सत्रात कु. निलाक्षी योगेश संदानशिव हिने गायन तर चि.यज्ञेश जेऊरकर, जळगाव याने एकल तबलावादन करुन उपस्थितांची मने जिंकली. द्वितीय सत्रात गुरु कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस आर चौधरी, मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सौ. नयना नवसारीकर यांना शाल, बुके, सन्मानपत्र चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना माजी प्राचार्य एस. आर. चौधरी यांनी जीवनाचा प्रवास उलगडला. सन १९५९ ला ज्या महाविद्यालयाच्या कार्यालयाची पायाभरणी सुरु होती तेथे आईने मजूरी केली, पायाभरणी केली. मी सन २००३ ला त्याच कार्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो हा जीवनाचा सर्वोच्च क्षण होता असे सांगत संस्था पदाधिकारी व अन्य सर्वांचे ऋण व्यक्त केले.
डॉ. डिगंबर महाले म्हणाले की, आई वडील हेच प्रत्येकाचे प्रथम गुरु असतात. मी खूप भाग्यवान आहे की, आई-वडिल दोघेही पेशाने शिक्षक असल्याने शालेय जीवनात माझ्यावर चांगले संस्कार झाले. प्राथमिक शाळेत शिकत असताना मला आई शिक्षिका असल्याने सर्वात जास्त शिक्षाही मलाच मिळाली. सहभाग घेतलेल्या २७ स्पर्धेत अव्वल स्थानी होतो, एकाही प्रमाणपत्रावर दोन हा आकडा आला नाही. ज्या ज्या गुरूंनी मला घडवलं त्या सर्वांच्या ऋणात राहू शकतो इच्छितो. मंचावर कला सादर करणाऱ्या बालकांचे कौतुक करताना गौरवोद्गार काढले. सहावीचा यज्ञेश जेऊरकर ने चांगले दर्शन घडविले. बोनसाय नावाचा वटवृक्ष नेहमीच लहान दिसतो तसं काही यज्ञेश चं आहे का ? असा प्रश्न पडतो. मछली की बच्ची को तैरना सिखाना नही पडता असे सांगत कु. निलाक्षी संदानशिव चे कौतुक केले.

कोकिळेचा आवाज सर्वांना आवडतो मात्र कावळ्याचा आवाज कोणाला आवडत नाही. कोकिळा चपलखपणे आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात नेऊन ठेवते आणि तो भोळा भाबडा कावळा ती अंडी उबवतो. त्या अंड्यातील पिलांना जन्म देतो. दुसऱ्याच्या पिलांना जगवण्याचे कार्य तो कावळा करत असतो हेच समजूतीतलं खरं अंतर आहे. माणसांची गर्दी खूप आहे पण गर्दी कमी आहे. खूप पाय आहेत पण वंदनीय चरण कमी आहेत. कोणत्या चरणाला नमस्कार करावा ? हा खरा प्रश्न आहे. सच्चाई, प्रेम, आदर शिकावा तर जोशी, मुठे परिवाराकडून. काहीतरी उत्तम करण्यासाठी वेड व्हावं लागतं आणि कालांतराने तीच वेडी म्हणणारी माणसं या वेड्यांचा इतिहास वाचतात असे सांगत डॉ. डिगंबर महाले यांनी जोशी, मुठे परिवाराचे कौतुक केले.
श्रीमती नवसारीकर म्हणाल्या की, ज्या वेळेला आपला सन्मान केला जातो त्या वेळेला आपली स्वतःची ओळख होऊन आपण काहीतरी केल्याची पावती मिळते. तृतीय सत्रात नेत्ररोग तज्ञ तथा शास्त्रीय गायक डॉ. अमोघ जोशी यांनी स्वराभिषेक कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तबलावादक – योगेश संदानशिव व श्रीपाद शिरवळकर, तालवाद्य – प्रथमेश शिरवळकर, संवादिनी – जितेश मराठे, व्हायोलिन – प्रबोध जोशी, लेहरा – दर्शन जेऊरकर, तानपुरा – डॉ. गौरव मुठे, कु. निलाक्षी संदानशिव यांनी साथ संगत दिली.
