व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

अमळनेर : पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकार जीव धोक्यात घालून वार्तांकनासाठी जात असतात. बदलापूर येथे लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकार जाधव यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी अमळनेेर तहसील कार्यालयात तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथील एका नामांकित शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने देश अस्वस्थ होऊन सर्वत्र पडसाद उमटले. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकार यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना जाहीर निषेध नोंदवित आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडिया चे तालुकाध्यक्ष उमेश काटे, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, बापूराव ठाकरे, ईश्वर महाजन, रविंद्र मोरे, जितेंद्र पाटील, दयाराम पाटील, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, उमेश धनराळे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडे, कमलेश वानखेडे आदींच्या सह्या आहेत.