साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा रंगली

प्रथम विजेता ठरला कल्याणचा यश रवींद्र पाटील

अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आयोजन समितीत समिती प्रमुख प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, सारांश सोनार, कौस्तुभ पाटील यांनी आपली भूमिका बजावली. आयोजन समिती कडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, आणि संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. अशोक पवार मनोगतात म्हणाले की, गुलाब बापू समाजवादी असल्याने ‘साथी’ उपाधी मिळाली. पुढे त्याच ‘साथी संदेश’ नावाचे वृत्तपत्र चालविले. खानदेश ची मुलुख मैदान तोफ म्हणून देशभर नाव गाजवले. त्यांच्या कृतीला शासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावाच लागायचा अशा ताकदीची भाषणे ते करत. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांनी काम केले.. शिंगाडे मोर्चा काढला. कापूस प्रश्नावर .. भरा गाडी चला वलवाडी हा नारा दिला होता. बापूंना अभिप्रेत असलेले विद्यादानाचे स्वप्न सानेगुरुजी शाळेतील सर्व शिक्षकवृंद पूर्ण करीत असल्याचे ते म्हणाले. यानंतर आयोजन समिती तील मान्यवरांचा लाल टोपी, रुमाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी बापूंच्या विचारांना व स्मृतीस अभिवादन करुन वक्तृत्व स्पर्धेविषयीची भूमिका व नियम समजावून सांगितले. बापू सलग ५ ते ७ तास सभेत भाषण करत. एखाद्या ब्रेक नंतर पूर्वीपेक्षा अधिक गर्दी त्यांच्या भाषणाला असे. हा धागा पकडून बापूंच्या प्रथम स्मृतिदिनी बहुश्रुत लोक तयार करण्याची परंपरा सुरु करुन विद्यार्थ्यांना वक्तृत्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी आयोजन, निवड समितीचे आभार मानून मुख्य स्पर्धा सुरु झाली. वकृत्व स्पर्धेसाठी सात मिनिटे वेळ देण्यात आला होता स्पर्धकांनी आपल्याच हातून टोकन नंबर काढून ज्या कोणाचा नंबर निघेल त्या स्पर्धकाला अनुक्रमे वकृत्वाची संधी दिली गेल्याने कोणावरही अन्याय होण्याची वेळ आली नाही. यात प्रथमच टोकन नंबर ११ ला प्रथम वक्तृत्वाचा मान मिळाला.

वकृत्व स्पर्धेसाठी पाच विषय देण्यात आले होते यातील वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धकांनी छान वकृत्व केले. सर्वात जास्त ‘खरा तो एकची धर्म..’ हा विषय निवडण्यात आला होता. धर्म म्हणजे काय ?.. धर्माच्या नावाखाली दंगली घडवल्या जातात. जातीत वाटणी कशाला..? रंजल्या गांजलेल्यांना आपलंसं करणे हा खरा धर्म. ज्या क्रांतीकारकांनी इतिहास घडविला, सीमेवर लढले व लढत आहेत अशा लोकांचा धर्म कोणता ? अशा मुद्द्यांवर प्रकाश टाकला. कोणाची मदत करण्यातही माणुसकीचा धर्म असतो. वर्चस्व नष्ट करण्यासाठी सच्चा हृदयाची गरज आहे. माणसाच्या हाती असतो जन्म आणि मृत्यू च्या मधला बेभरोशाचा काळ. या काळाचा सदुपयोग झाला पाहिजे. सर्व समाज सुधारक यांनी विश्वबंधुतेची ओळख करून दिली. धर्म आणि राजकारण स्वतंत्र आहेत. राष्ट्रध्वजात सारे रंग असूनही जाती जातीचे झेंडे वेगळे का ? असा प्रश्न पडतो.

माघार नव्हे.. ती होती समयसूचकता… टोकन नंबर २८ स्पर्धकाने वक्तृत्वाला छान सुरुवात केली मात्र काही क्षणातच त्याने स्वतःहून भाषण थांबवत समयसूचकता दाखवून माघार घेतली. त्या स्पर्धकाला बाद ठरविण्यात आले.

एका स्पर्धकाने ‘भारतीय संविधान व लोकशाहीच भवितव्य’ विषयावर बोलताना राजकारणाची दिशा बदलल्याने आता निवडणुकीत मालक नोकराला राव म्हणायला लागले. न्याय व्यवस्था, प्रशासन, कायदेमंडळ, प्रसार माध्यमे हे चारही स्तंभ पोखरले जात आहेत. लोकशाहीला पायदळी तुडवले जात असल्याचे सांगितले. एका स्पर्धक मुलीने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडण्यासाठी’आंदोलन शेतकऱ्यांची.. परिक्षा सरकारची’ विषय घेऊन सरकार ची लाज चव्हाट्यावर आणली. अशा गोष्टींचा विरोध होत नाही. माझा शेतकरी बाप आत्महत्या करतो.. तो एक शो होतो असे सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य… धोक्यात का ? हे सांगताना आजचा पत्रकार देखील मालकाच्या दबावाखाली व्यक्त होऊ शकत नाही. यामुळे निर्बंध लादण्याची गरज असल्याचे सांगितले.

तीन मिनिटांची उत्स्फूर्त फेरीतील विविध विषय

स्पर्धेतील उत्कृष्ट १५ जणांची निवड करुन तीन मिनिटांची उत्स्फूर्त फेरी घेण्यात आली. स्पर्धेत चिठ्ठ्यांद्वारे दोन विषयांपैकी एक विषयावर वक्तृत्व करावयाचे होते. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांत आजचा युवक, अभिव्यक्ती आणि आपण, A. I. भवितव्य, जग तापतंय, महाराष्ट्र माझा, बहुपदरी विचार, आम्ही भारताचे लोक, डिजीटल अक्टिव्हीजम, कुणी जॉब देतं का जॉब, द्रौपदी की दुर्गा..?, मला स्वतंत्र व्हायचंय, फॅशन कशाची..? , महाशक्ती म्हणजे काय रे भो.., पुस्तके का वाचावीत..? , सांगा कसे जगायचे..? या विषयांचा समावेश होता.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. शमा सुबोध सराफ (आय. एम. आर. कॉलेज, जळगांव ), प्रा. डॉ. सत्यजित बळीराम साळवे (मराठी विभाग, जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव), प्रा. नितीन सदाशिव पाटील. (इंग्रजी विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर ) यांनी काम पाहिले. आयोजकांकडून सर्व परिक्षकांचा लाल टोपी, रुमाल, प्रमाणपत्र, मानधन देऊन सन्मान करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना तीनही स्पर्धा परीक्षकांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले. सोबतच काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. ते म्हणाले की, बऱ्याच स्पर्धकांनी एकच भाषण केले. भाषण करताना समयसूचकता असायला हवी. कुठल्या युगात वावरता. वक्तृत्व करताना ४ उदाहरणे सोबत ठेवा म्हणजे पुन्हा तेच उदाहरण न देता वेगळं उदाहरण देता येईल. भाषणात नुसतेच पाठांतर नसावे. स्पर्धेचे नियम पाळलेच पाहिजेत. चांगले वक्तृत्व साठी पुस्तके वाचन करुन शब्दसाठा अत्यावश्यक आहे असेही ते म्हणाले.

यानंतर परीक्षक यांनी दिलेला निकाल प्रा. लिलाधर पाटील यांनी जाहीर केला. यात, प्रथम विजेता कल्याण येथील चि. यश रवींद्र पाटील, द्वितीय विजेता एम. एस. जी कॉलेज मालेगाव ची कु. कोमल नरेंद्र शेलार, तृतीय विजेता पुणे युनिव्हर्सिटी चा विद्यार्थी वरुण प्रकाश घरटे यांचे नाव घोषित केले. विजेत्यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ दोन बक्षिसांमध्ये प्रथम एम. एस. जी. कॉलेज मालेगाव ची कु. समृद्धी संजय मोराणकर तर द्वितीय एम. एस. जी. कॉलेज मालेगाव चा प्रशांत चिंतामण बेले यांचे नाव घोषित करण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी रुपये २ हजार व प्रशस्तीपत्र देऊन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ९ हजार, ७ हजार व उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये २ हजार, प्रशस्तीपत्र देऊन दि.२४ रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिक अनिता बोरसे व डी.ए.धनगर यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!