मराठा समाजाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार; खासदार स्मिताताई वाघ यांचाही केला नागरी सत्कार

मराठा समाजाच्या विकास कामासाठी मिळाली एकूण ३२ लाख ८२ हजारांची देणगी

अमळनेर : समाजाने मला खूप प्रेम दिले आहे. तुम्ही मला फक्त काम सांगा मी ती माझी जबाबदारी मानून शिरसावंत पार पाडेल. आजपर्यंत  मला अनेक पदांवर तुम्ही निवडून दिले आहे अशा शब्दात खासदार स्मिताताई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अमळनेर तालुका मराठा समाजाचे वतीने येथील कै. सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात खासदार स्मिताताई वाघ यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी चाळीसगांव चे आमदार मंगेश चव्हाण यांचा देखील समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नामदार अनिल पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. सोबत व्यासपीठावर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी नगराध्यक्ष  विनोद पाटील, प्रभाकरराव  देशमुख  व डॉ.अनिल शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख  सचिव विक्रांत पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, संचालक एस. एम. पाटील, मनोहर पाटील, संजीव पाटील, चंद्रकांत काटे, स्वप्नील पाटील, डॉ. सुमित पाटील, जे पी पाटील, गौरव पाटील, भूषण भदाणे आदी उपस्थित होते.

सोबतच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशवंत, गुणवंतांचा गौरव करण्यात आला. अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, असिस्टंट कमांडर यशपाल पवार -मठगव्हान, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव देसले यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संचालक संजय पाटील, पिंपळे खुर्द यांनी केले तर मराठा समाज तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांपैकी काहींनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेल्या भावना अशा…
यशपाल पवार : मी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो असलो तरी माझ्या संघर्षाची मोठी गाथा आहे. जीवनात खूप अडथळे आले पण मी संघर्ष करीत राहिलो आणि सीआरपीएफ मध्ये असिस्टंट कमांडंट झालो. अजूनही परीक्षा देत असून मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. एकदा ठरविले तर केस हमखास मिळते असे मागील अनुभवातून शिकायला मिळाले. एखादी गोष्ट ठरवली तर मागे हटू नका.. यश नक्कीच आहे असा संदेश शिकत असलेल्या तरुणांना दिला.
नाशिक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव देसले (नाशिक ग्रामीण) : आपण चांगला विचार करत असताना व्यापक दृष्टीने सर्व मानव जातीच्या भल्याचा विचार केला पाहिजे. आपल्या कार्याचा ठसा उमटवित आपली उपयुक्तता जनकल्याणासाठी कामी आली पाहिजे. माजी निवडणूक आयुक्त टी. एन. सेशन यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असेही नमूद केले. आयुष्यभर आपण शिकत राहिल्याने ज्ञानात भर पडत असल्याचे सांगितले.
निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील : मी मिल मध्ये कामास होतो. ध्येय निश्चित करुन त्याचे दिशेने चालत राहावे हा मंत्र  जपला व न्यायाधीश झालो व आता निवृत्त झालो. कमी बोलणे आणि जास्त एकत्र राहणे हे माझ्या यशाचे गमक असल्याचे सांगितले.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण : मदत देण्यासाठी माझा हात सदैव पुढे असतो असे सांगत त्यांनी अमळनेरच्या मराठा समाज संस्थेला ११ लाखाची देणगी घोषित केली. यातील ५ लाख रुपयातून समाजातील हुशार, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि उर्वरित ६ लाख रुपये संस्थेच्या विकास कामासाठी वापरावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
नामदार अनिल पाटील : समाज हाच माझा पाया आहे म्हणून समाजाचा मला अभिमान आहे. तुमच्यामुळेच मी आमदार झालो असे मान्य केले. उतराई होण्यासाठी मी देखील तेवढाच कटिबद्ध असतो. अमळनेरच्या मराठा समाज संस्थेला अजितदादांनी देखील २१ लाखाची देणगी जाहीर केली असून लागलीच घेऊन जा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पाटील व उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी मराठा समाज कार्यकारिणीने परिश्रम घेतले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले यांनी ५१ हजार व निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी ३१ हजाराची देणगी जाहीर केली आहे. समाजाला एकूण ३२ लाख ८२ हजार रुपये देणगी मिळाली आहे. अमळनेर तालुका मराठा समाजाच्या वतीने दात्यांचे आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!