पाटा गुळगुळीत असल्यावर वाटण होत नाही ना.. तसं वाटण बंद झालं की, आयुष्यही गुळगुळीत होतं : सुप्रसिध्द कवी प्रा. प्रवीण दवणे

अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून संधी हुकली हे शल्य आजही मनात.

अमळनेर : प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात असतात. आपापल्या कामात व्यस्त असायला पाहिजे, जागेपणा असायला पाहिजे म्हणजे कुठलीही भिती वाटत नाही. निसर्गापुढे लक्षात आलं की..’पाटा गुळगुळीत असल्यावर वाटण होत नाही ना.. तसं वाटण बंद झालं की आयुष्य गुळगुळीत होतं.’ निवृत्तीनंतर जमा झालेला फंड कमी जास्त प्रमाणात मिळतो मात्र संवेदना व कृतज्ञतेचा फंड त्यापेक्षा खूप मोठा असतो असे मत ठाणे येथील सुप्रसिध्द कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ‘दिपस्तंभ मनातले जनातले’ या विषयावर समारोपीय पुष्प गुंफताना ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सोबत सौ. प्रज्ञा प्रवीण दवणे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खा. शि. मंडळाचे डॉ. अनिल शिंदे व सौ. दिपाली अनिल शिंदे उपस्थित होते. सोबत विचार मंचावर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष अविनाश जोशी, सदस्य प्रदीप साळवी, श्याम पवार, भैय्यासाहेब मगर, बजरंगशेठ अग्रवाल होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. सौ. वसुंधरा लांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. यानंतर मान्यवरांचा व देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विशेष सत्काराचे शिलेदार…

  • कार्यक्रमात अभिप्राय स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यात प्रथम : अखिलेश मनोज पाटील, द्वितीय : चंदन भिका चौधरी, तृतीय : सनी राजूसिंग परदेशी यांचा समावेश होता.
  • मुंबई येथील श्री निंबा पाटील यांनी सुमारे १ लाख ६० हजार मुलांना नोकरी दिल्याबद्दल विशेष सत्कार झाला.
  • शारदीय व्याख्यानमालेला उपस्थिती देऊन वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांचाही सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात प्रमुख अतिथी डॉ. अनिल शिंदे यांनी अमळनेर शहराचा पुर्वइतिहास सांगितला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले, पुण्यातील परंपरा अमळनेेर शहरात जपली जाते याचा आज आनंद असल्याचे सांगितले.

कवी प्रवीण दवणे मनोगतात म्हणाले.. आधी डोळ्यातूनच सारे चित्र लिहून घ्यावे लागते, चित्र नंतर असते. आधी आपण चित्र व्हावे लागते.. कविता नंतर बोलते. आधुनिक मराठी काव्याचे जनक कवीश्रेष्ठ केशवसुतांच्या स्मरणदिनी एका कवीला बोलावण्याचं औचित्य दाखवलं त्याबद्दल मराठी वाड्मय मंडळ, अमळनेर च्या सर्व पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. ज्या भूमीत कृतीशील अध्यात्म साकारलं जातं अशा मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष राजू महाले सरांच्या कार्याची स्तुती केली. दिपस्तंभ उजाळताना अनेक विषयांना हात घातला. जात्यावर दळता दळता येणाऱ्या पिठात त्यांच्या मुखातली विद्या मिसळली आणि ते जगाचं विद्यापीठ झालं. अशा बहिणाबाईंच्या नगरीत, त्या वातावरणात ज्यांनी खऱ्या अर्थाने या आपल्या काळजाच्या खोप्याला शब्दांच्या संवेदनेचं माहेरघर दिलं. अशा ठिकाणी आपण राहता. म्हणून येथील कुठलीही माती उचलली आणि कपाळावर लावली की मला अभिजात वाटते. हे सांगताना त्यांना भडगावात केशवसुतांवर बोलण्याची संधी मिळाली होती. त्यांचे स्मरण करताना.. ‘एक तुतारी द्या मज आणुनि.., फुंकिन मी जी स्वप्राणाने.., भेदुनि टाकिन सगळी गगने.., दीर्घ जिच्या त्या किंकाळीने.., अशी तुतारी द्या मज आणुनि..’ या कवितेच्या ओळी म्हटल्या. समग्रता आणि एकाग्रतेने ऐकणारे श्रोते यातच खरे चैतन्य आहे. माणसं अशीच मोठी होत नाहीत. दिपस्तंभ सांगताना.. पुल देशपांडे, बा. भ. बोरकर, कुसूमाग्रज, निसर्ग कवी ना. धो. महानोर, बहिणाबाई चौधरी, लतादीदी मंगेशकर, आशा भोसले, अटलजी, पोफळे बाई यांचे संदर्भ देत अनेक किस्से सांगून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आजपर्यंत या भूमीत शारदीय व्याख्यानमालेस आधी ९ दिवस व अलीकडे ५ दिवस अशी सुमारे ५०० हून अधिक वक्ते येऊन गेले हीदेखील अभिमानाची बाब आहे. समाज आंतर बाह्य सुंदर करण्यासाठी, समाज निरोगी करण्यासाठी जो कार्यकर्ता जो शिक्षक, लेखक, नागरिक अहोरात्र राबतो. परमेश्वर अशांचा हातात हात घेऊन दाबतो. कशाचीही कमतरता भासत नाही.

अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून संधी हुकली हे शल्य आजही मनात आहेच. मात्र साहित्य संमेलनाचे हे वर्ष संपण्यापूर्वीच मला सानेगुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर मराठी वाड्मय मंडळाने मान दिला. कधीतरी तो योग येईलही अशी अपेक्षा व्यक्त केली.

योग्यवेळी झालेले डंख.. पंख होतात….

कवी प्रवीण दवणे पुढे म्हणाले की.. आपण पात्र असावं लागतं. जो पाण्याचा प्रवाह आराम करतो त्याचं डबकं होतं आणि जो प्रवाह धावतो तो समुद्राला जाऊन मिळतो. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. वेळीच कळत नाही आणि मावळल्यावर उशीर झालेला असतो. म्हणून असतानाच कळलं पाहिजे. मला आईने जगण्याचा डौल दिला. आम्ही म्हणायचं सगळं धान्य तुझ पालन करेल पण पुस्तक तुझं पालन पोषण करतील आणि माझ्या वडिलांनी मला माझ्या दहाव्या वर्षी ज्ञानेश्वरी व दासबोध अशी दोन पासबुके दिली. या दोन पासबुक मधील रक्कम तुला आयुष्यात कधीही कमी पडणार नाही असे सांगितले. ‘जो भिजेल तो रुजेल’ या उक्तीप्रमाणे ती पासबुके मला कामी आली. गरिबीची आठवण करुन देताना ‘प्रविण माझा दागिना..’ हे आईचं तेव्हाचं वाक्य मनावर कोरले गेले. योग्यवेळी झालेले डंख.. पंख होतात. आयुष्याच्या पूर्व रंगात अपूर्वाई आली. बटाट्याच्या चाळीस भेटल्या व्यक्ती आणि वल्ली वाऱ्यावरची वरात घेऊन आख्खे गणगोत आले सुंदर मी होणार कानात सांगून गेले. पु. ल. देशपांडे यांनी ‘प्रवीण’ या शब्दातील वेलांटी ची चूक कायम लक्षात आहे.. पुल जेव्हा चूक काढतात तेव्हा पुढे चुका होत नाही. म्हणून मुलांकडून कामे करवून घ्या. मन चैतन्यमयी असेल तर निराशा येत नाही. कवी बा.भ.बोरकर म्हणतात, वर्ग नावाच्या पंढरीत विद्यार्थी हा विठ्ठल असतो. शाळेत लेखकाला पत्र पाठविण्याची स्पर्धा घ्या. मोबाईल संस्कृती मुळे पत्र मागे पडले. मेसेजेस डिलीट होतात मात्र आलेली पत्र जपून ठेवता येतात. नुसतेच रंजन नको ..कवितांनी माझी पाठ चोळली आहे. म्हणून कविता गुणगुणली पाहिजे. वाडमय मंडळ ती मशागत करीत आहे.

पाली येथील ९० वयाचे दादासाहेब यांच्या भेटीत आश्रम शाळेच्या भिंतीवर ‘कृती हवी, बडबड नको’ असं वाक्य लिहिलं होतं. यावरुन शिक्षकाने कधीही विद्यार्थ्यांची तक्रार करु नये हे लक्षात आले. पुण्यात उमेद संस्थेत सिंधुताई जोशी समाजकार्य करतात.. तेथील ही मुले आनंदात असतात. आपल्याला सगळं असतं थोडं काही तरी नसतं.. तरी आम्ही दुःखी आहोत. परमेश्वराला जे आतले सांभाळता येत नाही ना..! त्यासाठी परमेश्वर पृथ्वीवर माझं घर निवडतो. मी भाग्यवान आई आहे असं सिंधुताई उतारवयात सांगतात. हे लक्षात घ्यायला हवे. आजचा काळ दिसण्याचा आहे. विनामूल्य संस्कार घडवणाऱ्या पोफळे बाई नी घराला मॉन्टेसरी केले. लहान मुलांना सुगंध किंवा गंध देताना त्या बाई रंगीबेरंगी फुलांचा, गुलाबाचा, धुतलेल्या शुभ्र कपड्यांचा, उन्हात वाळवलेल्या करकरीत कपड्याचा, सारवलेल्या मातीचा, लाल मातीचा, गरम भाकरीचा  वास येताना येणारा सुगंध दिला व तो दरवळला. त्यांनी  माझं मृत शरीर जाळायचं नाही, पुरायचं नाही, काही नाही करायचं. आपल्या लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मुलांना अभ्यासाला वापरायचे असं ईच्छा पत्र त्यांनी लिहून ठेवलं. हे कळाल्यावर त्यांचे शिष्य असलेल्या विद्यार्थ्यांनी दुसरे मृत शरीर अभ्यासासाठी आणावे, या शरीरावर आम्ही काही करणार नाही असे सांगितले. यावरुन लक्षात येते की, शिक्षकांचा गुरु तेव्हा होतो.. जेव्हा विद्यार्थ्यांचा गुरु होतो. आशाताईंना जेव्हा विचारलं गेलं… कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय आहे ? यावर सुखी माणूस कलावंत होऊ शकत नाही व तो माणूसही होऊ शकत नाही. आजची मुलं कुठेच तडजोड करत नाहीत.

नैनिताल कौटुंबिक प्रवासावेळचा अटलजींच्या भेटीचा किस्सा सांगितला.. आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून… ‘महाराष्ट्र से एक कवी आया है..’ अशा वाक्याची चिठ्ठी पाठवून आत प्रवेश मिळाला व अटलजींसोबत चर्चा झाली. कविता ही साथ देते. अनेक कथा, व्यथांवर मात करणारी माणसं आहेत. आपल्या दिव्यात तेल आपल्यालाच घालायचं आहे. जाणीवांच दारिद्र्य दूर करण्यासाठी असे कार्यक्रम उपयोगी पडतात. समाजाने दानपेटीत टाकलेलं दान सरस्वती ला पावते. शेवटी ‘मैफल सगळी जमून येते..’ या कवितेतील ओळींनी कार्यक्रम आटोपला. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ .अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शिला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंग लाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे, प्रा. डॉ. पी. बी. भराटे यांनी केले तर आभार वसुंधरा लांडगे यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!