आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याचा सेनेचा निर्धार

अमळनेर : राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागला असून भाजप -सेनेला जनतेने सत्ता स्थापनेचा कौल देवूनही मुख्यमंत्री पदासाठी या दोनही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे बॅनर मुंबईत झळकले असून आता अमळनेरमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे. अभि नहीं, तो कभी नहीं…! होय.. आता वाघाचं बछडंच होईल मुख्यमंत्री…! अशा मजकूराचे बॅनर शहरात झळकले आहेत. “दिलेल्या वचनाला आता जागा…” असेही भाजपला या बॅनरमधून कळविले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपा शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी चर्चेला बोलवत आहे तर शिवसेनाला मुख्यमंत्री पदासाठी लेखी हवे आहे. या निवडणुकीत महायुती केलेले दोन्ही पक्ष आज एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. सत्ता स्थापनेसाठी काही दिवस उरले आहेत. दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करतात की, अन्य वेगळे राजकीय समीकरण महाराष्ट्राला पाहायला मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र.. शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी ठाम असल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. शिवसेनेच्या ठाम भूमिकेने शिवसैनिकांत आनंद असून आपलाच मुख्यमंत्री व्हावा, अशी ईच्छा व्यक्त केली जात आहे.
या बॅनरवर स्व.बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, आमदार गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ या नेत्यांसह शहर प्रमुख प्रताप शिंपी, डॉ राजेंद्र पिंगळे, संजय कौतीक पाटील, मनिषा परब, नितीन निळे, जीवन पवार, मुन्ना शिंपी आदी स्थानिक पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे आहेत.