मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले यांनी उपस्थितांना शपथपत्र वाचून दिली शपथ
कलावंतांचा एकाच वेळी भावनिक व आगळा वेगळा सत्कार

अमळनेर : येथील व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुंबई येथील निशा मोकल प्रस्तुत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला कलावंतांचा ‘मंगल सूर’ व सोलापूर येथील लंडन, पॅरिस, म्युनिक व अमेरिका देशातील २२ शहरांत २५ प्रयोग करुन गाजलेला व महाराष्ट्राने गौरवलेला झी मराठीचा पहिला हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ असा एकत्रित कार्यक्रम नुकताच दिनांक १३ नोव्हेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाला. गीत -संगीत -लावणी -कॉमेडी -मिमीक्री ची धमाकेबाज आणि ठसकेबाज आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिलजी म्हस्के व तसेच अमळनेर शहरातील उपस्थित गायक, संगीतकार, नर्तक, नाट्य कलावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या सर्व उद्घाटक कलावंतावर एकाचवेळी पुष्पवृष्टी करून अत्यंत भावनिक, आगळा-वेगळा असा सत्कार करण्यात आला. या सत्काराने कलावंत भारावून गेले.

- डॉ. डिगंबर महाले हेच आमचे भावी वारसदार…
- व्हॉईस ऑफ मीडियाचे ‘प्रदेश सरचिटणीस’ पदी दोन महिन्यांपूर्वी निवड झाल्यानंतर लगेचच डॉ. डिगंबर महाले यांनी अमळनेर सारख्या तालुक्यात भरगच्च असा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे संघटन व असलेली उपस्थिती सर्व काही दर्शविते. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन झाल्याने आम्ही भारावून गेलो आहोत. साहजिकच भावी काळातील ‘प्रदेशाध्यक्ष’ म्हणून डॉ. डिगंबर महाले हेच आमचे वारसदार असतील अशी ग्वाही देतो.
… अनिलजी मस्के : प्रदेशाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया.
यावेळी पप्पूज आईस्क्रीमचे भूपेंद्र जैन, महावीर आईस्क्रीमचे प्रकाश जैन, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, निरज अग्रवाल, मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओमप्रकाश मुंदडा व अमेय मुंदडा, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, नाट्यगृहाचे संचालक हेमकांत पाटील या विशेष योगदान देणाऱ्या दात्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कलाकारांचा सत्कार व जनजागृतीचा वसा…
- आम्हाला शहरातील कलावंतांना न्याय मिळावा या उद्देशाने ऑफ मीडियाच्या वतीने उपस्थित सर्व कलावंतांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांनी सर्व कलावंतांचा एकाच वेळी सत्कार केला असा अनुभव प्रथमच अनुभवायला मिळाल्याची प्रतिक्रिया कलावंतांकडून मिळाली.
- विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी उपस्थितांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले यांनी शपथपत्र वाचून शपथ दिली. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक डॉ. रविंद्र चौधरी, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, विजय माहेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान घुंगरांच्या तालावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत.. गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी.. अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने लोक रंगभूमीवर नवा रंग भरला.

शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडाटात, ढोलकीच्या तालावर अनेक प्रेक्षकांची व चिमुरड्यांची पाऊले आपसूकच थिरकली. एकापेक्षा एक बहारदार लावण्या सादर झाल्या. जुन्या, नव्या बाजाच्या लावण्या व सिनेगीते यानिमीत्त रसिकांना बघायला व ऐकायला मिळाल्या. शहरातील कला क्षेत्रातील अनेक दिग्गज नामवंत तसेच रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी झाली होती. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच सर्व तिकिटे विक्री होवून शो हाऊसफूल झाला होता. व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब देशमुख यांनी आभार मानले.
‘मंगल सूर’ कार्यक्रमात या कलावंतांचा होता सहभाग…
मंगल सूर या कार्यक्रमात ढोलकी वादक : निशा मोकल, कीबोर्ड : मनोज शिवलिंग, रुपेश पाटील, ड्रम : भक्ती कापडिया, प्रेषिता मोरे, ऑक्टोपॅड : प्रिया वाजे, ढोलकी : देवाशिष पाटील, गायक : सपना हेमन, विजय धुरी, पंकज गामरे, अँकर : हेमलता तिवारी, डांसर : भूमिका भोसले आणि अंबिका पुजारी आदींनी उत्कृष्ट सादरीकरण केले.