आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये मानधन; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पाठपुराव्याला यश

मुंबई (प्रतिनिधी): सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांना मिळणारे मानधन ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यासंदर्भात शासनाने घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज या फाईलला मंजुरी दिली असून, येत्या एप्रिलपासून पत्रकारांना २० हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले आहे.

शासनाने यापूर्वी सेवानिवृत्त पत्रकार यांना मानधन वाढीची घोषणा केली होती. मात्र, ती अंमलात येण्यासाठी निधीची तरतूद केली जात नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मागणीनंतर तत्कालीन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दस्तावेज तयार करून तो वित्त व नियोजन विभागाकडे पाठवला होता. याला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, तरी निर्णय होऊ शकला नव्हता. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या मानधनासाठी ५० कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले. आता येत्या महिन्यापासून २०० पात्र पत्रकारांना या वाढीव मानधनाचा लाभ मिळेल. अनेक वेळा सरकार आश्वासन देते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मात्र, यावेळी अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आहे. याबद्दल ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस डिगंबर महाले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, मंगेश खाटीक, विजय चोरडिया, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ आणि विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिन मोहिते, मराठवाडा सतीश रेंगे पाटील, विदर्भ किशोर कारंजेकर, उत्तर महाराष्ट्र मिलिंद टोके, कोकण अरुण ठोंबरे यांनी सरकार व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे.  पत्रकारांसाठी हा लढा असाच सुरु राहील, असा विश्वास यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सरचिटणीस डिगंबर महाले यांनी व्यक्त केलाय. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!