अक्षय तृतीये पासून संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ; प्रशासन ॲक्शन मोडवर

रथ मिरवणूक ८ मे रोजी तर पालखी मिरवणूक १२ मे रोजी

अमळनेर : येथील प्रतिपंढरपूर असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला आज अक्षयतृतीया पासून प्रारंभ होत आहे. रथ मिरवणुकीपासून बोरी नदीपात्रात विविध दुकाने थाटली जातात. दरवर्षी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक यात्रेसाठी येतात. बोरी नदी पात्रातील ही यात्रा सुमारे १५ दिवस सुरूच राहते. या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. नगरपालिका प्रशासनाने नदीपात्राची साफसफाई सुरु केली असून पाणीपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेत आहे. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे. महावितरण तर्फे यात्रेत वीज पुरवठा खंडित न होता वीज सुरळीत राहावी म्हणून नवीन फिडर टाकले जात आहे.

यात्राकाळात होणारे कार्यक्रम…

  • ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बोरी नदीपात्रात हभप प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत स्तंभारोपण व समाधी मंदिरांवर ध्वजारोहण होणार आहे.
  • ३० एप्रिल ते ७ मे दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ तुकाराम महाराज गाथा भजन होणार आहे.
  • ३ मे ते ५ मे दरम्यान जिल्हास्तरीय भजनस्पर्धा होणार आहेत.
  • ६ मे रोजी सखाराम महाराजांचे चवथे गादीपती हभप प्रल्हाद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप जयदेव बुवा गुरव यांचे किर्तन होणार आहे.
  • ७ रोजी सकाळी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे आगमन होईल.
  • ८ मे रोजी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला सायंकाळी साडे सात वाजता रथोत्सव होणार आहे. वाडी चौकातून विठ्ठल मंदिरापासून रथ मिरवणूक सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड, पैलाड मार्गे बोरी नदीतून दुसऱ्या दिवशी सकाळी रथ जागेवर येईल. या मिरवणुकीत बागलाण तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक कला मंडळाचे विशेष आकर्षण असेल.
  • ११ रोजी संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त वाडी चौकात मोफत सर्व रोग निदान शिबीर होईल.
  • १२ रोजी सकाळी ६ वाजता वाडी चौकातून पालखी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत भुसावळ व चाळीसगाव येथील बँड चे विशेष आकर्षण असेल. रथ मार्गाप्रमाणेच पालखीचा मार्ग असेल.
  • १३ रोजी हभप मोहन बेलापूरकर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होईल.

यासह मंदिर परिसरात हभप शारंगधर देशमुख बुवा यांचे वारकरी किर्तन , अनिता पद्माकर जोशी यांचे नारदीय किर्तन, डॉ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर यांचे दासगणू महाराज परंपरेतील नारदीय किर्तन, हभप लोटांगणे महाराज यांचे भजन, सांस्कृतिक कला निकेतन यांचे संतांचे निरुपण आणि त्यांनी रचलेल्या अभंगावर कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रमाकांत भालेराव यांचा नुपूर कथ्थक नृत्याचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम, बाल किर्तनकार अग्रणी (तृप्ती ) हिचा किर्तनाचा कार्यक्रम, सखा माऊली मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या भारुड व संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. हभप किसन गोळेसर यांच्या अभंगाचा, तर हभप श्रीनिवास महाराज उत्राणकर यांच्या पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होईल. याव्यतिरिक्त समाधी मंदिरासमोर विविध किर्तनाचे कार्यक्रम होतील. भाविकांनी यात्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप प्रसाद महाराज गुरू ज्ञानेश्वर महाराज व श्री सद्गुरु संत सखाराम महाराज माऊली विठ्ठल रुख्मिणी संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!