खान्देशी माणसाचं नवीन वर्ष.. आखाजी


क्षय तृतीया अर्थातच खान्देशातली आखाजी. लौकिक अर्थाने पितरांचा सण म्हणून खान्देशात आखाजीचं महत्व आहे. खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण म्हणून प्रचलित आहे. शेतकऱ्यांसाठी ती नववर्षाची सुरुवात आहे. खान्देश हा कृषीप्रधान असल्याने येथे राहणारा नागरिक हा शेतकरी, शेतमजूर किंवा शेतकऱ्याच्या घरातील शिकलेले मुलं-मुली आणि सध्या सरकारी नोकरदार झालेले सुशिक्षित यांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे परंपरेनुसार खान्देशी माणसाला आखाजीचं मोठं अप्रुप वाटतं. खान्देशी माणसाचं नवीन वर्ष आखाजीलाच सुरु होतं. आखाजी सण हा रणरणत्या उन्हाळ्यात येतो. या काळात शेतकऱ्याची शेतजमीन मशागत होवून पडलेली असते. शेतीची सर्व कामे झालेली असतात. शेतकरी नवीन हंगामासाठी पावसाकडे तसाच लेकीच्या आगमनासाठी तिच्या सासरकडे आतुरतेने डोळे लावून बसलेला असतो. तसा तो निवांत झालेला असतो. या सणासाठी त्याची लेक माहेरी येणार असते. ती तिच्या सासरी तिला न्यायला येणाऱ्या मुऱ्हाईची वाट पहात असते. दारी असलेल्या झाडावर कावळा बसला आणि तो कावकाव करु लागला की तिला माहेरची आठवण अधिकच उचंबळून येते.

करे कावळा काव काव, उना आखाजीना सन ।
येईन मुऱ्हाई लेवाले, वाट देखे बहिननं मन ।।

सासरी तिला सतत राब राब राबावंच लागतं. अनेकांच्या पाचवीला पूजलेला सासुरवास हा त्यांना चैत्र -वैशाखाच्या उन्हासारखा दाहकच वाटतो. यातून थोडा विसावा मिळावा म्हणून ती माहेराला दोन दिवस जाण्याची संधी शोधते. जी तिला आखाजी मिळवून देते.

चैत्र-वैशाखनं उन, तशी दाह सासरनी ।
माय माहेरनी मया, घागरनं थंड पानी ।।

माहेर तिला मातीच्या घड्यातील थंड पाण्याची शितलता देतं. ही पोळलेली लेक घरी येणार म्हणून तिची आई लाटपाटच्या दिवशी शेवाया, सांजोरी, घुन्या करुन ठेवते. त्यात तिची माया दडलेली असते. यासाठी तिची ऊडालेली झुंबड बघण्यासारखी असते.

झुंबड बघ उडलियं, लाटपाट घाईची ।
सांजोऱ्यात दडलियं, गोड माया गं आईची ।।

येथे आल्यावर आई, वडील, भाऊ, भावजाई, भाचे पाहून तिचं मन तृप्त होतं. आईच्या हातच्या गरमागरम खापरच्या पुरणपोळ्या म्हणजे तिच्या जीवाची आवड. मनसोक्त पुरणपोळी खाण्याची हौस ती येथे पुरवून घेणार असते.

भाऊ,भावजाई,भासास्नी,डोयाभरी भेट लेसू ।
माय बाईना हातनी, पुरन पोई गरम खासू ।।

गोडधोड खाणं झालं म्हणजे मैत्रिणींसह गुजगोष्टी. सासरची एकमेकांची उखाळी पाखाळी आणि गंमती जमती करत सा-या मैत्रीणी झोक्याचा आनंद घेतात. घरात आगोदरच गौराईची स्थापना केलेली असते. ही गौराई म्हणजे पार्वती. तिला लहान मुली आपल्या परीने सजवतात. विविध खाद्य पदार्थांच्या माळा चढवतात. ज्यात काजू, बदाम, किसमिस, डांगर, टरबूजच्या बिया, सांजोरी यांचा समावेश असतो. लेकीला आवडीचं भरपूर खाऊ घालावे हा भाव या खेळात असतो. हा संस्कार लहान मुलींमध्ये बालवयातच बिंबवला जातो.

खान्देशात या निमित्ताने आखाजीच्या घागरी भरतात. मातीच्या घागरी पाण्याने भरुन वर मातीचाच लोटा ठेवतात. त्यात पाणी भरुन त्यावर डांगर ठेवतात. त्यावर पुराणाची पोळी ठेवून पूजन करतात. स्वर्गस्थ आत्म्यांसाठी पितर बसवतात. या विधीमध्ये माती, जल, फल, अन्न आणि माणूस यांचे पूजन केले जाते. एका अर्थाने हा लोकान्न, लोकोत्सवच आहे. आखाजी खान्देशवाशीयांच्या दृष्टीने अतिशय मोलाची… सर्व सणांमध्ये तोलाची आहे. शेतकऱ्यांसाठी ती नववर्षाची सुरुवात आहे. शेतीच्या नियोजनाची, भविष्यातील संकल्पांची नांदी आहे. कष्टकरी सालदार, शेतमजूरांसाठी वर्षभराची मजुरीची बेगमी आहे. लेकीसाठी माहेरचा विसावा आहे. लहान मुलींसाठी आनंद-उत्सवाचं घबाड आहे. खवैय्यांसाठी गोड धोड मिष्ठांन्नाची चंगळ आहे. नशीब अजमाऊन पाहणाऱ्या पत्ते खेळणाऱ्यांसाठी श्रीमंत होण्याची एक संधी आहे, जावयांसाठी मान -पान आणि भेटी वस्तूंचा अलभ्य लाभ आहे. काय नाहीये ? या सणामध्ये. सारं काही आहे आखाजीत. म्हणून तर ती सगळ्यांच्या प्रितीची आहे. ती भरभरुन शक्ती देते लढायला आणि जगण्यालाही !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!