
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून नाव असणं हे त्या त्या व्यक्तीने केलेल्या व करीत असलेल्या कर्तृत्वाचा एक भाग असतो. अंतरमनातून तशी स्वच्छ भावना असावी लागते. एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की, त्यातून गावाचंही नशीब उजळणार असतं. असंच काहीसं अध्यात्मिक कौटुंबिक वारसा असलेलं व्यक्तिमत्त्व शिक्षक प्रदीप लोहारे यांच्या रुपाने पाहायला मिळते. पातोंडा ता .अमळनेर येथील श्री दत्त विद्यामंदिर विद्यालयाचे शिक्षक प्रदीप लोहारे हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्तीनंतर कुठल्याही गोष्टीत मन रमत नसल्याने दोन महिन्यातच त्यांनी शाळेसाठी निशुल्क ज्ञानदान करण्याचा मानस संस्था चालकांकडे व्यक्त केला. शाळेत शिक्षकांची कमतरता असल्या कारणाने व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संस्थेने या ध्येय वेड्या शिक्षकास निःशुल्क ज्ञानदानासाठी रीतसर परवानगी दिली. त्या दिवसापासून शिक्षक प्रदीप लोहारे नियमित शाळेच्या वेळेवर येऊन विद्यार्थ्यांना निःशुल्क ज्ञानदानाचे कार्य करत असतात. ‘इतिहास’ हा विषय शिकविताना ते विद्यार्थ्यांसमोर अक्षरश: पूर्ण घटना डोळ्यासमोर उभी करतात. निशुल्क काम करत असताना देखील आपल्या वैयक्तिक कामासाठी रीतसर परवानगी वा रजा घेऊनच ते बाहेर पडतात. नियम तो नियम.. अशी त्यांची विचारधारा आहे. अध्यात्मिक कौटुंबिक वारसा असल्याने ते प्रबोधन व मार्गदर्शन करीत असतात. ‘विद्यार्थ्यांचे हित हेच… माझे समाधान’ हे प्रदीप लोहारे यांचे ब्रीदवाक्य असल्याने समाजसेवा त्यांना स्तब्ध बसू देत नव्हती. त्यांच्या निःशुल्क ज्ञानदान करण्याच्या निर्णयाचे पातोंडा ग्रामस्थ व पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षक प्रदीप लोहारे यांना गावात” चालतं फिरतं रेकॉर्ड कार्यालय ” म्हणून वेगळी ओळख आहे. पातोंडा सारख्या दहा हजारांहून अधिक लोक वस्ती असलेल्या गावात प्रत्येक व्यक्तीला ते नावानिशी ओळखतात. एवढं च नव्हे तर, कोणती व्यक्ती कोणत्या गल्लीत कुठे राहतो, सदर व्यक्ती हा कोणाचा कोण लागतो याची माहिती त्यांना असते. आपल्या ३७ वर्षे सेवा काळातील सर्व दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखतात. कोणत्या बॅचला कोण प्रथम.. द्वितीय.. तृतीय आला होता याची नोंद त्यांचेकडे असते. याशिवाय गावात कोणत्या वर्षात किती लोक मृत्यू झाले ? याची सर्व नोंद ते ठेवत असतात. जात-पात, धर्म, पंथ असा कुठलाही भेदभाव न करता ते गावातील प्रत्येक समाज घटकांच्या सुख दुःखात सामील होतात. अध्यात्मिक कौटुंबिक वारसा असलेले प्रबोधन व मार्गदर्शन करत असतात. असं व्यक्तिमत्व म्हणून नाव कमावणं सोपं नाही. त्या त्या व्यक्तीने केलेल्या व करीत असलेल्या कर्तृत्वाचा तो एक भाग असतो.
