
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : शहरातील सर्व मालमत्ताधारक आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने मालमत्ता हस्तांतरण (फेरफार) शुल्कामध्ये मोठी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय नुकताच सर्वसाधारण सभेत घेतला आहे. शहरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीचा आदर करत हा दिलासा देण्यात आला आहे.
नवीन सुधारीत मालमत्ता हस्तांतरण दर खालीलप्रमाणे राहतील:
- खरेदी-विक्री दस्ताऐवजावरून हस्तांतरण: यापूर्वी खरेदी मूल्याच्या २% शुल्क आकारले जात होते. आता त्यात निम्मी कपात करण्यात आली असून, यापुढे खरेदी मूल्याच्या केवळ १% शुल्क आकारण्यात येईल.
- दस्ताऐवजाशिवाय हस्तांतरण (उदा. वारस नोंद): यासाठी आता रु. १,५००/- इतका निश्चित दर राहील.
मालमत्तेची खरेदी-विक्री झाल्यानंतर नगरपरिषदेच्या दप्तरी आपल्या नावाची कायदेशीर नोंद (हस्तांतरण) करणे अत्यंत आवश्यक असते. यापूर्वी शुल्काचे दर जास्त असल्याने अनेक मालमत्ताधारकांनी आपले हस्तांतरण केलेले नव्हते. आता हे शुल्क १% इतके कमी झाल्यामुळे नागरिकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तरी, ज्या नागरिकांच्या मालमत्तेचे हस्तांतरण (फेरफार / वारस नोंद) अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आजच नगरपरिषदेत मालमत्ता कर विभागात संपर्क साधून आपल्या मालमत्तेचे अधिकृत हस्तांतरण करून घ्यावे. आपल्या मालमत्तेची नोंद त्वरित करून आपली मालमत्ता कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित करुन अमळनेर शहराच्या विकासात आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन अमळनेर नगरपरिषद तर्फे करण्यात आले आहे.