पत्रकार ईश्वर महाजन यांना व्हॉईस ऑफ मीडिया चा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ जाहीर


(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते. समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे प्रकाश टाकत सकारात्मक दृष्टीकोनातून सत्य मांडण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने अमळनेर येथील पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना उत्तर महाराष्ट्रातून प्रतिष्ठेचा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे दरवर्षी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ दिला जातो. मुंबई येथे दिनांक १५ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आपल्या परखड, अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लिखाणासाठी ईश्वर महाजन ओळखले जातात. सामाजिक प्रश्न, जनतेच्या अडचणी आणि विविध घडामोडींवर त्यांनी सातत्याने प्रभावी लेखन करत पत्रकारितेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक विषयांना वाचा फुटली असून समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत व्हॉईस ऑफ मीडियाने त्यांची ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड अवॉर्ड २०२५’ साठी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा सन्मान उंचावला आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदीपजी काळे यांनी स्वतः भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले आणि मुंबई येथे सहकुटुंब सहपरिवार पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे सांगितले. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य संयोजक गोरक्षनाथ मदने, राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. साप्ताहिक विंगचे जिल्हा अध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा संघटक जयेश कुमार काटे, उपाध्यक्ष उमेश धनराळे, सल्लागार धनंजय सोनार, मिलिंद पाटील, राज्य प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे, तालुका अध्यक्ष उमेश काटे व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!