अभिजात मराठी भाषेचा जागर: प्रताप महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेची तसेच विविध साहित्यिकांच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बाबुराव बागुल यांच्या ‘मी जात चोरली’ या कादंबरीचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. डॉ. रमेश माने यांनी कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेची विद्यार्थ्यांना ओळख करून देत त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. तसेच प्रा. योगेश पाटील यांनी भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ आणि ‘हिंदू’ या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.

ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील तसेच मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांचे ग्रंथ पाहिले, त्यांची ओळख करून घेतली तसेच अनेक ग्रंथांचे वाचन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याविषयीची अभिरुची, वाचनाची आवड आणि साहित्यकृतींच्या चिकित्सक आकलनाची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाळ बडगुजर यांनी केले, तर आभार दीपाली पाटील या विद्यार्थिनीने मानले. या कार्यक्रमाला मराठी विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!