छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या : कवयित्री गुंजन पाटील

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : आपण महापुरुषांना हार घालण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या’ असे आवाहन खान्देश कन्या कवयित्री गुंजन पाटील यांनी केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काल रविवार, दि.४ रोजी खान्देश कन्या कवयित्री गुंजन पाटील यांची काव्य मैफिल रंगली त्यावेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाज, महिला सुरक्षा, संस्कृती, शेती, बदलती मानसिकता आदी विषयांना हात घालत कवयित्री गुंजन पाटील यांनी आपल्या कवितांतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी रसिक प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होती. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार अनिल पाटील, तर अध्यक्षस्थानी कृषिभूषण साहेबराव पाटील होते. विचार मंचावर नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील नगरसेविका जयश्री पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. अनिल शिंदे, जितेंद्र पारेख, निरज अग्रवाल, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, चेतन राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

कवयित्री गुंजन पाटील यांनी प्रेम, बायको, शीड हरवलेली नाव, डोरलं, मी शेतकऱ्याची पोर, गरीब सीता, मला आई व्हायचं नाही आदी कविता सादर केल्या. सर्व कविता ऐकताना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मध्यंतरात अहिराणी कवी शरद धनगर, आढावताई यांनीही आपली कविता सादर केली.

- कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भाग्यश्री वानखेडे यांचा ‘एक सावित्री’ आणि मीराबाई रामलाल साळी यांचा ‘निरार्थ’ या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ..
- भीषण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत रुपये ५० हजार पाठविण्यात येणार असल्याचे कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जाहीर केले.
- विशेष कार्याचा गौरव… नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जनावेळी अनेक हातांनी हातभार लावला. यात विशेष करुन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केलेल्या विशेष कार्याचा गौरव करण्यात आला. सोबतच पोलीस खातेसाठी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, होमगार्ड संघटनेचे कैलास पाटील, विद्युत विभागाचे हेमंत सैंदाणे, नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी प्रातिनिधिक सत्कार स्विकारला.
कवयित्री गुंजन पाटील यांनी पोलीसांची समाजाप्रती असलेली जबाबदारी कार्ये कशी महत्त्वाची असते याची जाणीव करुन दिली. स्त्री ला अधिकार क्षेत्रात ठेवल्यानंतर तुम्ही तिचे मालक बनतात. पिढ्यान पिढ्या पुरुषांना शिकवलत गेलय की, ते महिलांचे मालक असतात. त्यांचे निर्णय त्यांच्या हातात असतात. घरातून संस्कार देताना मुलीला सातच्या नंतर घरात असावं अशी अपेक्षा असते. विचित्र प्रकार घडत असताना कुठे जाते माणूसकी. तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे का वाटत नाही ? असा परखड सवाल उपस्थितांना केला. आपली संस्कृती खराब होते हा प्रश्न समाजामध्ये वेळोवेळी विचारला गेला पाहिजे. घरातून मुलांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे. मुलींनी स्वतः संरक्षित राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.
महाभारतातील गांधारी चा संदर्भ देत आजच्या समाजातील उदासीनतेकडे लक्ष वेधले. घराघरात एक गंधारी डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. तुम्ही रस्त्यावर तमाशा बघत बसतात म्हणून कोणीही द्रौपदीचे वस्त्रहरण करून जातो. ‘रोज रावण नवीन रुप धारण करून येतो.. गरीब सीता कुठवर वाचेल ?’ या ओळींतून महिला सुरक्षा व निष्क्रियता बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची गरज असल्याचा मौलिक संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील, गौतम पाटील, सुनील भोई, भूषण महाजन, अक्षय साळी, यश वर्मा, विजय राजपूत, वरुण पाटील, शरद धनगर यांनी विशेष प्रयत्न केले.