साप्ताहिक ‘औरंगाबाद युवा’चे संपादक अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांचे निधन

पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा; व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे अध्यक्ष म्हणून बजावली महत्त्वाची भूमिका

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : छत्रपती संभाजीनगर येथील साप्ताहिक ‘औरंगाबाद युवा’चे मालक तथा संपादक आणि व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे अध्यक्ष अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरासह जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांनी ‘औरंगाबाद युवा’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि नागरी प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. पत्रकारिता करताना जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका होती. पत्रकारितेबरोबरच संघटनात्मक कार्यातही ते सक्रिय होते.
व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे अध्यक्ष म्हणून साप्ताहिक वृत्तपत्रांचे मालक, संपादक आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठीही ते प्रयत्नशील होते. पत्रकारांच्या संघटनात्मक चळवळीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारिता, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. एक सक्रिय पत्रकार, संघटक आणि सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा पत्रकारितेतील सहकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आहे. अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांच्या निधनाने पत्रकारिता आणि पत्रकार संघटनात्मक क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांच्या कार्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!