कायदा, सायबर सुरक्षा व महिला सुरक्षिततेवर जनजागृती

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्ताहभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कायदा, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षितता या विषयांवर आयोजित जनजागृती कार्यक्रमाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमात अमळनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कविता ठाणगे यांनी विद्यार्थ्यांना महिलांविषयक विविध कायदे, महिला सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी तसेच संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी कार्यरत असलेल्या ‘दामिनी पथका’ची माहिती दिली. विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रसंगाला घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने त्याचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पोलीस कॉन्स्टेबल अरविंद वानखेडे यांनी मोबाईल आणि इंटरनेटचा निष्काळजीपणे वापर केल्यास निर्माण होणाऱ्या सायबर धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत तरुणाई अशा गुन्ह्यांच्या जाळ्यात कशी अडकते, याचे त्यांनी विवेचन केले. सोशल मीडिया, अनोळखी लिंक, बनावट संदेश आणि ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी केले.

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने आर्थिक साक्षरता विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. जितेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवहारातील सुरक्षितता आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लिलाधर पाटील आणि महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मिनाक्षी इंगोले यांनी नियोजन व आयोजनासाठी विशेष सहभाग घेतला. सप्ताहातील सर्व उपक्रमांना महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.