राष्ट्र उभारणीत साहित्यिकांचाही मोलाचा वाटा : सुभाष अहिरे

साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मानवी मन घडविण्याचे प्रभावी माध्यम


(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मानवी मन घडविण्याचे, संवेदनशील बनविण्याचे आणि त्याच्या जगण्याला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे आहे मत कथाकार सुभाष अहिरे यांनी व्यक्त केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रताप महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने विविध साहित्यिक व भाषिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या शृंखलेत मंगळवार, दि.६ ऑक्टोबर रोजी ‘मराठी कथाकथन’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठी विभागातील डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील आणि तुषार पाटील उपस्थित होते.

सुभाष अहिरे पुढे म्हणाले की, कथा ही माणसाच्या जीवनाशी, अनुभवांशी आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेली असल्याने तिच्या माध्यमातून जीवनमूल्ये, सामाजिक भान आणि मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त करता येतात. त्यांच्या ओघवत्या आणि रसाळ कथाकथनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रभावी कथाकथनाने विद्यार्थ्यांना साहित्याच्या सर्जनशील आणि सामाजिक सामर्थ्याचा अनुभव मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षाचा आणि त्यामागील विविध प्रयत्नांचा आढावा घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा केवळ भाषेचा सन्मान नसून मराठी संस्कृती, साहित्य, परंपरा आणि भाषिक वारशाचा गौरव आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत, विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, साहित्याचा आस्वाद घ्यावा आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बडगुजर यांनी केले. डॉ. विलास गावित यांनी प्रमुख पाहुणे सुभाष अहिरे यांचा परिचय करून दिला. तर आभार प्रा. सागर सैंदाणे यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!