पशुपालकांनी आपले पशुधन सुरक्षित, सुदृढ ठेवण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,जळगाव यांचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यात मका, ज्वारी, सोयाबीन सारख्या पिकांचे अकाली पावसामुळे नुकसान झाले आहे. या पिकांच्या कडब्यावर ॲस्परजिलस नायगर बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अशा प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ऑक्झॅलीक ॲसीडचे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे बोंडाच्या फुलाचे/फुल गवतामध्ये सुद्धा ॲक्झालिक ॲसिडचे १८ टक्के प्रमाण जास्त असते. अशा प्रकारचा चारा जनावरांना खाऊ घातल्यास जनावरांच्या रक्तातील कँल्शियम बरोबर संयोग हाेऊन कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटीक तयार होतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होवून अवयवांचे कार्य मंदावल्याने जनावरांचा मृत्यु होतो. होणारी विषबाधा ही गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या इ. जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.
बुरशीयुक्त चारा खाल्ल्याने बाधीत झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे १ ते १२ महिने सतत बुरशीयुक्त चाऱ्याच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आजाराची लक्षणे अशी.. जनावरांध्ये भुक मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे, लाळ गळणे, जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासाेच्छवास घेण्यास त्रास होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात, लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे, जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे, बध्दकोष्टता हे लक्षणे तिव्र विषबाधा असल्याची लक्षणे दिसून येतात व यात जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांना बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या चाऱ्यावर चुन्याची निवळी शिंपडून, वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा. योग्य ती काळजी घेवूनसुध्दा जनावरांना बाधा झाल्यास, नजिकच्या पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधून आपले पशुधन सुरक्षित सुदृढ ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.