शॉपिंगने केला घात, दोन दिवसांनी होणार होता विवाह.

कापडणे : शिरपूर तालुक्यातील जुने भामपुर येथील मुरलीधर नाना पाटील बोरसे यांची मुलगी वैशाली उर्फ कादंबरी हिचा संसार वेलीवर पदार्पणापूर्वीच अपघातात मृत्यू झाला. कापडणे येथील सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहर लोटन पाटील यांचा मुलगा प्राध्यापक चेतन उर्फ सचिन याचेशी वैशालीचा विवाह जमविण्यात आलेला होता. बुधवार, ता.२० नोव्हेंबर रोजी हिरे मंगल कार्यालय, धुळे येथे विवाह समारंभ पार पडणार होता. लग्नात लागणारे मेकअप साहित्य खरेदी करण्यासाठी जात असताना वैशालीचा शिरपूर येथे ट्रक व मोटरसायकल अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
मिळालेली माहिती अशी की, ता.१७ नोव्हेंबर रोजी भामपुर येथून सीडी डीलक्स मोटार सायकलने वैशाली ही आपला भाऊ व मावस बहिणीसोबत लग्नासाठी किरकोळ बाजार आणि मेकअप साहित्याच्या शॉपिंगसाठी निघाली होती. मोटार सायकल भाऊ चालवत होता. मोटार सायकल ने शिरपूर कडे जात असताना वाघाडी जवळील आश्रम शाळेजवळ मोटरसायकल ओव्हरटेक करत असताना समोरून दुसऱ्या मोटर सायकलची जबर धडक लागली. यात मोटारसायकल चालक भाऊ व मावस बहीण हे रोडच्या कडेला बाजूला फेकले गेले तर वैशाली रोडच्या मधोमध फेकली गेली. वैशालीच्या डोक्याला जबर मार लागला व हिचा एक हात ट्रकच्या चाकाखाली दाबला गेला. वैशालीच्या डोक्याला जबर मार लागल्याने या अपघातात तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी रस्त्यावरती रक्ताचा सडा पडलेला दिसून येत होता. यानंतर वैशालीला शिरपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी धुळे येथील दवाखान्यात उपचारासाठी रवाना केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले. अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली.
धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात वैशालीचे शवविच्छेदन झाल्यावर दुपारी तीन वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिरपूर तालुक्यातील जुने भामपुर येथील राहत्या घरून रविवारी सायंकाळी पाच वाजता अंत्ययात्रा निघाली होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, काका काकू असा परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैशालीच्या दुर्दैवी मृत्यूने कापडणे व भामपूर या दोन्ही गावात हळहळ व्यक्त होत आहे.