विश्वविक्रमी एकपात्री काव्य नाट्यानुभव ..”कुटुंब रंगलय काव्यात” कार्यक्रमास मोठी गर्दी
अमळनेर : ‘उत्कट भावनांचा अविष्कार म्हणजे कविता’ असे मत सुप्रसिध्द कवि प्रा. विसूभाऊ बापट यांनी व्यक्त केले. ओंकार साधना निर्मित… गीतगायन, साभिनय सादरीकरणाने नटलेला सुप्रसिध्द कवि विसूभाऊ बापट यांचा विश्वविक्रमी एकपात्री काव्य नाट्यानुभव .. “कुटुंब रंगलय काव्यात” हा कार्यक्रम नुकताच पार पडला. येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृहात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी उत्सवानिमित्त ज्ञानेश्वर पाठशाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमावेळी मंचावर सुप्रसिध्द कवि विसूभाऊ बापट, राहुल मुठे, सौ.बिराज मुठे, श्री ज्ञानेश्वर पाठशाळेचे अध्यक्ष सुनिल जोशी, केतन जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्र.ज.जोशी यांनी केले. ‘कुटुंब रंगलय काव्यात’ चा हा ३०२२ वा प्रयोग होता. तबला वादक केतन जोशी, संजय शिंपी यांनी साथसंगत दिली. काव्य रसिकांसाठी ती खास मेजवानी ठरली.
कार्यक्रमास वेदघोषाने सुरुवात करुन मान्यवरांंच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस निरिक्षक अंबादास मोरे यांचा सत्कार करण्यात आला. गुरु, सरस्वती, गणपती नमनाने काव्यमैफीलीस प्रारंभ झाला. काव्य म्हणजे काय, कवितेची व्याख्या काय ? यावर प्रकाश टाकतांना पूर्ण अर्थपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. उत्कट भावनांचा अविष्कार म्हणजे कविता. त्यात आदरयुक्त भावना असावी असेेेेही विसूभाऊनी प्रकाशबाबा आमटेंच्या कवितेतून पटवून दिले. यावेळी प्रा. बापट यांनी अंगाई गीत, पाळणा गीत, कथा गीत, बडबड गीत, अभिनय गीत, उत्कटता गीत, देशभक्ती गीत, बोबड गीत, बाल कविता, प्रेमकविता, जशाहिरी काव्य, गझल गीत, कव्वाली काव्य, हायकू काव्य, विडंबन काव्य, वात्रटिका अशा अनेक काव्य प्रकारांचा उलगडा केला. संत नामदेवांचे पहिले बोबड गीत काव्य, कवि पठारे यांची पुणेकरांची व्यथा मांडणारी सदाशिव पेठेची कविता, वसंत बापट यांची शृंगार कविता म्हटली. गणपती आणतांना जेवढा उत्साह तर जातांना उत्साह नसतो यावर बाप्पा तुम्ही या हो.. कविता सादर केली.
लहानांसाठी बालकविता, मोठ्यांसाठी प्रेमकविता सादर करतांना कुसुमाग्रज, पाडगावकरांची कविता.. ” करु दे की प्रेम जरा.. तुमचं काय गेलं. करु दे की मला सांगा.. तुमचं काय गेलं ” सादर केली. ” ऊन ऊन खिचडी, साजूक तूप… वेगळं व्हायचंय, भारीच सुख ” ही सासु सूनांचे वर्णन करणारी अप्रकाशित कविता अप्रतिम ठरली. “दोघांचा संसार.. दिवाळी दसरा” ही मो.दा.देशमुख, वरोरा यांची प्रसिध्द कविता म्हटली. पाऊसावरील काव्य वर्णन करतांना ” रेन रेन गो अवे”, ” येरे येरे पावसा “तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ” दे रे आभाळा दे पानी” जगदीश खेबुडकरांची कशी नशिबाने थट्टा आज मांडली या चालीवरील “आज मरुनिया जीव झाला मोकळा.. देवा सोहळा सुखाचा आज पाहिला” या कविता सादर केल्या.
चले जाव आंदोलन, सध्याच्या राजकारणावर वात्रटिका करत समाचार घेतला. मोडक्या पायाची लोकशाही १९४७ पासून उपभोगली. आता तरी स्थिर शासन हवे असे सांगितले.
शब्द वेगळे, अर्थ एक सांगतांना चेहरा.. थोबाड… मुखडा.. यावर स्पष्टीकरण केले. भाऊसाहेब पाटणकर यांचे शाहिरी काव्य, सुरेश भट यांचे गझल गीत, कव्वाली, शिरीष पै यांचे हायकू काव्य, रामदास स्वामींचे मना सज्जना, मराठी काव्य सखी मंद झाल्या तारका.., यशवंत देव यांचे विडंबन काव्य देहाची तिजोरी या चालीवरील “मरण धाड देवा आता..” म्हटले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानानंतर “वन्दे मातरम..”, “बलसागर भारत होवो..” या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.
