सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

आढावा बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि गैर वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार

अमळनेर : दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकही अभियंता हजर राहत नसल्याने पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी बांधकाम विभाग गाठले. तेथेही कोणी उपस्थित नसल्याने फोन केल्यावर, तुमचा आमचा काही संबंध नसल्याचे उपअभियंता यांनी सांगताच पंचायत समिती पदाधिकारी चांगलेच भडकले. झालेल्या प्रकारामुळे त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला.

याबाबत माहिती अशी की, पंचायत समितीत दरमहा आढावा बैठक घेण्यात येत असते. पंचायत समितीकडून पत्र पाठवून संबंधित सर्व विभागांसह सार्वजनिक बांधकाम विभागालाही आढावा बैठकीसाठी बोलावण्यात येत असते. परंतु सतत दोन वर्षांपासून संबंधित विभागाचे एकही अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी मिटींगला येत नसल्याने पंचायत समितीचे सर्व सदस्य,पदाधिकारी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारी जाऊन आढावा बैठक घेण्यासाठी गेले. तेथेही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकही अधिकारी हजर नसल्याचे आढळून आल्याने पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुरध्वनीने वारंवार फोन करून उपअभियंता यांना बोलावून आढावा बैठक घेण्यात सांगितले. दरम्यान, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी उपअभियंता यांना दरमहा आढावा बैठकीस हजर न राहण्याबाबत विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्याने तुमचा आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे गैर वक्तव्य केले. यामुळे पंचायत समिती पदाधिकारी संतप्त झाले. झालेल्या प्रकारामुळे त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला. आढावा बैठकीस गैरहजर राहणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि गैर वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती वजाबाई भिल, उपसभापती श्याम बापू अहिरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पं.स.सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद पाटील, नाटेश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!