कापसाचा हमी भाव ५ हजार ५०० रुपये असून ग्रेडिंग पध्दतीने सुकलेला कापूस घेणार
अमळनेर : येथील ढेकू रोडवरील लामा जिनिंग अँण्ड प्रेसिंग फॅक्टरीत भारत सरकारच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) तर्फे हमीभावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ नुकताच शनिवारी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम शेतकरी विश्वास अंबर पाटील यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते टोपी, रुमाल देऊन स्वागत करण्यात आले.
कापूस खरेदी केंद्राची ही सुविधा शेतकर्यांसाठी लाभदायक असून याद्वारे योग्य वजन, हमीभाव, खात्रीशिर व्यवहारासाठी चेकद्वारे पेमेंट आणि विश्वासपूर्ण व पारदर्शक खरेदी प्रक्रिया देण्याची हमी लामा जिनिंग हे देतील, अशी अपेक्षा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली. २०१४ पासून कापूस खरेदी बंद झाली होती. गेल्या सरकारने पणन महासंघाला वाळीत टाकण्याचे काम केले होते. महाआघाडी सरकार आल्याने पणन महासंघाला परत चांगले दिवस येतील. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जातो. कापसाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी आपण शासनाकडे आग्रही मागणी करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना नोंदणी टोकन व माल खाली करण्याची जबाबदारी नियोजनबद्ध करण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही अशी हमी देखील आमदार पाटील यांनी दिली.
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजाभाऊ होलार यांनी केले. कापसाचा हमी भाव ५ हजार ५०० रुपये असून ग्रेडिंग पध्दतीने सुकलेला कापूस घेतला जाईल. त्यासाठी १२ टक्क्यांपेक्षा कमी आद्रता असू नये असे आवाहन होले यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील, कृ.उ.बा. समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, अॅड. एस.एस. ब्रम्हे, बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, संचालक हरी भिका वाणी, भगवान कोळी, शंकर बितराई, राहुल पाटील, सदाशिव पाटील, सचिव उन्मेष राठोड, पणनचे झोनल मॅनेजर राजाभाऊ होले, ग्रेडर एस.के.पाटील, विनोद कोठारी, यतीन कोठारी आदी उपस्थित होते.

