
धुळे : पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे ‘भारतीय राज्यघटनेतील मूल्यव्यवस्था’ या पुस्तकाची दखल घेवून धुळे येथील सुप्रसिध्द विचारवंत डॉ. बी. आर. जोशी यांना सन्मानित करण्यात आले. शतकोत्तर रौप्य महोत्सवात सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. जोशी हे धुळे येथील विद्यावर्धिनी वाणिज्य व कला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांच्या ‘भारतीय राज्यघटनेतील मूल्यव्यवस्था’ या ग्रंथातील लेखन वृत्तपत्रांतूनही प्रसिध्द झाले आहे. त्यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. यापूर्वीही विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली १२५ वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्युदयासाठी कार्य करण्याचे उद्देशाने नामवंत महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी ही संस्था इ. स. १८९४ मध्ये स्थापन केली आहे.