वृक्षारोपण करुन संरक्षणासाठी केल्या उपाययोजना
अमळनेर : येथील चोपडा रोडवरील अंबऋषी टेकडी एक पर्यटन केंद्र बनले असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे व टेेेेकडी ग्रुप यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, विविध संघटना यांच्या साथीने अंबऋषी टेकडीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कडाक्याच्या थंडीत सकाळी सात वाजता अधिकारी, कर्मचारी व पर्यावरण प्रेमी श्रमदानासाठी टेकडीवर उपस्थित होते. अंबऋषी टेकडीवर पर्यटनासाठी येणाऱ्या काही अल्पसंतुष्ट भाविकांनी कचरा केल्याने टेकडीवर अस्वच्छता पसरली होती. तेथील सर्व गवत, कचरा काढून परिसर स्वच्छ करण्याचे काम उपस्थितांनी केले. वृक्षारोपण करुन संरक्षण देण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही केल्या.
श्रमदान शिबिरात उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, माजी आमदार शिरीष चौधरी, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी भारत वारे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, टेकडी ग्रुपचे मोतीलाल जैन, मधुकर दुसाने, आशिष चौधरी, डॉक्टर अनिल वाणी, उमेश धनराळे, हेमंत पाठक, राजेंद्र भावसार, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, सोमचंद संदानशिव, संतोष बिऱ्हाडे, सुनील भामरे, पंकज चौधरी, डॉ.राजेंद्र सोनार, संतोष पाटील, नरेश कांबळे, विजय माहेश्वरी, तुळशीराम भदाणे आदी स्वच्छता अभियानात सहभागी होते.
