मारहाण करून लुटमार करणाऱ्यास अटक

औरंगाबाद : येथील महामार्गावर वाहनधारकास व शेतवस्तीवर मारहाण करून लुटमार करणार्‍या आरोपीस औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारीख १२ जुलै २०१९ रोजी अमोल पाटील (वय २६, रा. सोनाळा, ता. जामनेर, जि. जळगाव) यांची ह्युंडाई कार भेंडाळा शिवारात पंक्चर झाल्याने खाली उतरले. पंक्चर चाक बदलत असताना चार इसम दोन मोटारसायकलवर येऊन त्यांनी त्यांचे सोन्याची चेन, रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण ४०,८००/- रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. तसेच १० जुलै रोजी २ वाजता रुस्तुम केरे (वय ४०, रा. सुलतानाबाद, ता. गंगापूर) यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम व नगदी असा एकूण ४३,५००/- रुपयांचा ऐवज अज्ञात इसमाने चोरून नेला. पोलीस स्टेशन सिल्लेगाव येथे सदर गुन्हा दाखल आहे. तसेच २७ ऑगस्ट रोजी सतीश शिरसे (वय २१, रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) हे मोटरसायकलवरून जात असताना पोळ रांजणगाव शिवरात गोपाळ ढाब्याच्या पुढे चार चोर तोंडाला रूमाल बांधलेले पळत आले व त्यांनी शिरसेंचा मोटरसायकल, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ८८ हजारांचा ऐवज लुटला. पोलीस स्टेशन सिल्लेगाव येथे सदर गुन्हा दाखल आहे.
अशा प्रकारे औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत चोरी व जबरी चोरीचे गुन्हे घडताना पाहून वरिष्ठ अधिकार्‍यांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पोलीस पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. यात खबर मिळाली की, रवी काळे सिंधीसिरसगाव, ता. गंगापूर हा असे गुन्हे करत आहे. त्यानुसार तो सिंधीसिरसगाव येथील गायरानात असल्याची बातमी मिळाल्यावर फुंदे व कर्मचारी यांनी तिथे सापळा रचून त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने सुरेश संभाजी काळे (रा. शिवराई, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), विकी काळे (रा. लक्ष्मी गायरान, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अजय काळे (रा. गाढवनाला, ता. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्यासह मागील दोन-अडीच महिन्यांत नगर औरंगाबाद रोडवर कारचालकास मारहाण करून लुटमार व शेतीवस्तीत जाऊन चोरी केली असल्याचे उघडकीस आले. तसेच त्यांनी पोळरांजनगाव ते वसुसायगाव रोडवर मोटरसायकल चालकास मारहाण करून लुटमार व शेतीवस्तीतही चोरी केली होती. चितेगावमधून वाळुंज व वाळुंज एमआयडीसी येथून मोटरसायकल चोरून गुन्ह्यासाठी वापरल्या होत्या, असे सांगितले. आरोपीकडून दोन मोटरसायकल व मोबाईल असा एकूण ५६,४००/- रुपयांचा ऐवज जप्त केला असून, पोलीस स्टेशन गंगापूर, सिल्लेगाव, वाळुंज, एमआयडीसी वाळुंज येथील १ गुन्हा व पोलीस स्टेशन बिडकीन येथील १ गुन्हा असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळंके, हवालदार रतन वारे, नवनाथ कोल्हे, बाळू पाथ्रीकर, सुनील शिराळे, रमेश अपसनवाड, रामेश्‍वर धापसे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे यांनी केली आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!