विधवांच्या सन्मानाच्या दिशेने समाजासमोर आदर्श
बुलडाणा : पतीच्या निधनानंतर पत्नीची ओळख ही विधवा म्हणून उरते. कुटूंब आणि समाजाच्या या विधवेच्या जगण्याला अनेक मर्यादा पडतात. राजपूत समाजात विधवेचा पूनर्विवाह करण्याची प्रथा नाही. असे असले तरी एका राजपूत समाजातील तरुणाने रुढी परंपरेला फाटा देत एका विधवेच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्यामुळे विधवेचा पूनर्विवाह म्हणजेच सन्मान पर्वाची विधायक सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल.
दोन वर्षापूर्वी अमोना येथील संगीता केशव सुरडकर या तरुणीचा विवाह झाला होता. मात्र, आजारपणामूळे तिच्या पतीचे निधन झाले. ऐन तारुण्यात संगीताच्या जीवनातील जगण्याचे सूर हरविले. अशातच, रुढी परंपरेला फाटा देत समाजाची पर्वा न करता, दिवठाणा येथील ज्ञानेश्वर पुंडलीक मोरे या अविवाहित तरुणाने संगीताशी विधिवत विवाह करण्याची तयारी दाखविली. त्यांचा विवाह सोहळा सव येथील जगदंबा संस्थानात थाटामाटात पार पडला. याप्रसंगी गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी ज्ञानेश्वरच्या निर्णयाचे कौतुकही केले.
भारतातील सर्व समाजांनी पूनर्विवाहाला मान्यता दिली. मात्र राजपूत समाजाच्या दृष्टीने आजही अनेकजण याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. आतापर्यंत राजपूत समाजात मुलीच्या पूनर्विवाहाला मान्यता नव्हती. आजच्या काळात मात्र विधवांच्या सामाजिक सहजीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. विधवांच्या विवाहासाठी जवळपास सर्वच जातीधर्मातील लोक पूढाकार घेतांना दिसून येतात. अर्थात या मागे मूलींची घटलेली संख्या हे मूळ कारण नाकारता येणार नाही. त्यामूळे विधवांच्या सार्वत्रिक सन्मानाच्या दिशेने असणारा ज्ञानेश्वर-संगीताचा हा पूनर्विवाह समाजासमोर आदर्श ठरला आहे.