मराठा महिला मंडळ आयोजित प्रबोधन समारंभ संपन्न

अमळनेर : मराठी वाड्:मयात आई इतकं वात्सल्य आणि ममत्व जर कुणी जपलं असेल तर ते कवितेच्या वाड्:मय प्रकारानं. कारण.. संस्कार, संस्कृती आणि कविता यांचं जवळचं नातं असून मुळात हा साहित्य प्रकार शाश्वत व भेदाच्या पलीकडचा आहे. तुमची आई माझी आई होऊ शकत नाही, माझी आई तुमची आई होऊ शकत नाही. तुमच्या माझ्या आईला वयाच्या मर्यादा आहेत. पण कवितारुपी आईला वयाचं ही बंधन नाही हे सांगताना सातशे वर्षांपासून माऊलीचं पसायदान आजही म्हटले जाते असे सांगत कवितेला नियतीनं अमरत्व बहाल केल्याचे मत कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी व्यक्त केले. येथील मराठा सभागृहामध्ये ता.२९ रोजी मराठा महिला मंडळाने आयोजित केलेेेल्या प्रबोधन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होतेे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावण पाटील होते. महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील उपस्थित होत्या.
प्रा.आंधळे पुढे म्हणाले की, मी आईच्या उदरात असताना तिने म्हटलेल्या कविता ऐकत ऐकत जन्माला आलो, त्यानंतर पाळण्यात कविता ऐकायला मिळाल्या, पाण्यातून शाळेत गेलो तेथेही कवितेने भरभरून संस्कार दिले. थेट प्राध्यापक झाल्यानंतर ती काव्य श्वासासारखं शरीरभर नांदत राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत कविता प्रत्येकाच्या मनात घर करून राहते हे सांगताना इयत्ता पहिली पासून ते एम.ए. पर्यंतच्या कवितांची बरसात करत उपस्थितांना खिळवून ठेवले. कवितेने जन्मापासून मृत्यूपर्यंत केलेले संस्कार सांगतांना कवी बहिणाबाई चौधरी, आ.ज्ञा पुराणिक, भा.रा.तांबे, अनंत फंदी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ग.ह.पाटील, सुरेश भट यांसह पारंपरिक लोक कवींच्या कवितांचे अभ्यासपूर्ण संदर्भ आपल्या व्याख्यानातून दिले.
कार्यक्रमात पत्रकार तथा शिक्षक ईश्वर महाजन यांना वर्ल्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील व महिला मंडळाच्या सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भारती पाटील यांंनी तर आभार प्रदर्शन रेखा मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.शीला पाटील, माधुरी पाटील, पद्मजा पाटील, विजया देसर्डा, लीना पाटील, रागिनी महाले, प्रभा पवार, भारती पाटील, भारती गाला, मनीषा पाटील, सुलोचना वाघ यांनी प्रयत्न केले. यावेळी शिक्षिका, प्राध्यापिका, डॉक्टर, गृहीणी, समाजसेविका अशा विविध स्तरावरील गृहीणींची उपस्थिती होती.