सभापतीपदी सौ.रेखा पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर : येथील पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड आज ता.२ रोजी पार पडली. या निवडीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले. आज झालेल्या निवडणुकीत भा.ज.प. ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३ सदस्य असे संख्याबळ असतांना राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत भा.ज.प. मध्ये प्रवेश केला होता. मात्र ते पुन्हा राष्ट्रवादीत असल्याचे स्पष्ट केले. आज झालेल्या ८ सदस्यीय पंचायत समिती मध्ये भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पक्षातर्फे सभापती पदासाठी जानवे गणातील रेखा नाटेश्वर पाटील यांचा तर उपसभापती पदासाठी मुडी गणातील भिकेश पावबा पाटील यांचा असे दोन अर्ज दाखल केले होते. त्या व्यतिरिक्त कोणीही विरोधात अर्ज दाखल न केल्याने पिठासन अधिकारी तथा तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सौ.रेखा पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पाटील यांची बिनविरोध निवड घोषित केली. पिठासन अधिकारी मिलिंद वाघ यांना प्रभारी गट विकास अधिकारी ए.बी.राणे, कक्ष अधिकारी के.टी.पाटील, अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर, अव्वल कारकून नितीन ढोकने, वरिष्ठ सहाय्यक देवेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती वजाबाई भिल, माजी उपसभापती त्रिवेणी बाई पाटील, सदस्य कविता पाटील, विनोद पाटील, प्रविण पाटील, निवृत्ती बागुल उपस्थित होते. याशिवाय, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल पाटील, शीतल देशमुख, श्याम अहिरे, श्रीनिवास मोरे, नाटेश्वर पाटील, मच्छिंद्र पाटील, जिजाबराव पाटील उपस्थित होते. आमदार स्मिताताई वाघ यांनी निवडीबद्दल अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.