फुले आंबेडकर विद्यापीठाचा राज्यस्तरीय संविधान परीक्षेचा निकाल जाहीर

कोल्हापूरचा उदय खिलारे प्रथम, प्रिया खैरे द्वितीय व मिनाक्षी हुमने तृतीय तर जळगावचे श्रीराम पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक



नाशिक : फुले आंबेडकर तत्त्वज्ञान विद्यापीठ संचलित सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठातर्फे यावर्षी २७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय संविधान गौरव परिक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी उदय भारत खिलारे प्रथम, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रिया ओमप्रकाश खैरे द्वितीय, ठाणे जिल्ह्यातील मिनाक्षी हुमने तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांंत मुंबईचे सेवानिवृत्त पालिकाधिकारी तथा जळगाव जिल्ह्यातील खवशी (ता.अमळनेर) येथील श्रीराम अर्जून पवार व सातारा येथील सोनाली संजय पवार यांना जाहीर झाली आहेत. सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठातर्फे एका पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर लहानपणीच समतावादी संस्कार होवून मुले धार्मिक उन्मादाच्या उत्सवात वा जातीय दंगलींच्या कार्यक्रमात सामील होत नाहीत. गेल्या २६ वर्षांपासून फुले आंबेडकर तत्त्वज्ञान विद्यापीठातर्फे पुरोगामी अभ्यासक्रमावर आधारीत परिक्षा आयोजित केल्या जातात. विविध सामाजिक विषयांवर पाठ्यपुस्तके छापून त्यावर १०० गुणांची राज्यस्तरीय परिक्षा आयोजित केली जाते. यावर्षी २७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय संविधान गौरव परिक्षा आयोजित करण्यात आली होती. परिक्षेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय संविधान जसेच्या तसे छापण्यात आले आहे. राज्यभरात १०० परिक्षा केंद्रे कार्यरत असून वर्षभरातून एक अथवा दोन परिक्षा आयोजित केल्या जातात.

या परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थीस १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये व तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये रोख बक्षीस व परिक्षेत सहभागी होणार्‍या प्रत्येक परिक्षार्थीस आकर्षक प्रमाणपत्र दिले जाते. परिक्षार्थींनी आपल्या प्रमाणपत्रासाठी केंद्रप्रमुखांशी संपर्क करावा असे सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ यांनी कळविले आहे. अध्यक्ष प्रा.श्रावण देवरे व माजी अध्यक्ष किशोर गजभिये यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!