अमळनेर: विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काॅंग्रेस आघाडीतर्फे अनिल भाईदास पाटील यांचे नाव निश्चित असल्याने एक ऑक्टोबर रोजी ते पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर नामांकन दाखल करणार आहेत. यासाठी त्यांनी नुकताच मतदार संघातील अंतुर्ली, अंबारे, दरेगाव, खापरखेडा येथे जन आशिर्वाद दौरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रा सुरेश पाटील, शिवाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी अनिल भाईदास पाटील यांचे नारळ व रोख रक्कम देउन आशिर्वाद दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे एक ऑक्टोबर रोजी अनिल भाईदास पाटील हे नामांकन दाखल करणार आहेत यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. तालुक्याची अस्मिता व स्थानिक भूमिपुत्र असलेल्या अनिल पाटील यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.
नामांकन दाखल करतेवेळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस व काॅंग्रेस आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आवाहन राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आले आहे.