
अमळनेर : तालुक्यातील करणखेडा येथील बंधन युवा फाऊंडेशन व शारदा नेत्रालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच ता.१७ रोजी विठ्ठल मंदिर संस्थानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिबिरात गरजु, वयोवृद्ध लोकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली. पंचक्रोशीतील अंबारे , खापरखेडे, मुडी, हिंगोणे, दरेगाव, मारवड, कळमसरे आदी गावातील गरजू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या शिबिराला धुळे येथील शारदा नेत्रालयाचे डॉ.दिपक थोरात, किरण सूर्यवंशी, अमोल रणधीरे, शिबिराचे प्रचार प्रमुख अमोल वानखेडकर, रामलाल जैन आदी उपस्थित होते. या शिबिरात १३५ हुन अधिक रुग्णांना तपासण्यात येवूून पैकी ३३ रुग्णांना शिफारस करून शारदा नेत्रालय, धुळे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रवाना करण्यात आले. काही रुग्णांना नाममात्र दरात रुपये ५० मध्ये चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी बंधन युवा फाऊंडेशनचे पदाधिकारी, गावातील तरुण तसेच ग्रामस्थ “आपण समाजाचे काही देणे लागतो” या एकमेव भावनेने अपार मेहनत घेतांना दिसून आले. असे अनोखे शिबीर आयोजित केले म्हणून गावातील नागरिकांनी बंधन युवा फाऊंडेशनचे कौतुक केले. फाऊंडेशनद्वारे असेच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गावकऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी बंधन फाउंडेशन चे सचिव यांनी शिबिराला उपस्थित डॉक्टर, रुग्ण, ग्रामस्थांचे आभार मानले.