शेतकऱ्यांची अडवणूक करुन जो केंद्रचालक आधार प्रमाणीकरणासाठी पैसे घेईल त्याचा परवाना रद्द करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचा इशारा
जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करताना काही केंद्रचालक शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कोणी केंद्रचालक आधार प्रमाणीकरणासाठी पैसे मागत असल्यास शेतकऱ्यांनी त्याची तक्रार तात्काळ तहसीलदार अथवा जिल्हा प्रशासनाकडे करावी. शेतकऱ्यांची अडवणूक करुन जो केंद्रचालक आधार प्रमाणीकरणासाठी पैसे घेईल त्याचा परवाना रद्द करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी इशारा दिला आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहिर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत सुरु आहे. आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित केंद्राला शासनामार्फत शेतकरीनिहाय रक्कम देण्यात येणार असल्याने कोणत्याही शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरणाकरीता केंद्रचालकास पैसे देवू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी केले आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ८३२ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी व बँकांच्या बाहेर लावण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. आतापर्यंत १ लाख १२३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे प्रमाणीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होण्यासाठी आवश्यक ते उपाय योजन्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिली आहे.
तथापि, या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांकडून पैश्याची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करतांना कुणालाही पैसे देवू नये. तसेच कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अथवा इतर कोणीही शेतकऱ्यांकडून रक्कम घेऊ नये असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.