शहरातील सर्व एम.डी. डॉक्टर्स व आय.एम.ए संघटनेचे सदस्यांची होतेय प्रशासनाला मदत

अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आजपासून सर्दी, ताप, खोकला तपासणी सेवा केंद्र सुरू झाले असून शहरातील सर्व एम.डी डॉक्टर्स व आय.एम.ए संघटनेचे सदस्य प्रशासनाला मदत करीत आहेत. त्यात सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत असून आवश्यक त्या गोळ्या, औषधे लिहून दिली जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात काल आमदार अनिल पाटील यांनी प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा करण्यात आली होती.
शहरातील खाजगी डॉक्टर्सकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना साने गुरुजी शाळेत तपासणी साठी पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्या सर्वांची नोंद घेतली जावून सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळलेल्या रुग्णांची साने गुरुजी शाळेत सकाळी १० ते १ वेळेत आज पहिल्याच दिवशी ४९ प्रौढ व २६ बालके अशी एकूण ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी पूर्वी साने गुरुजी शाळेचा परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुक करण्यात आला होता. प्रौढ व बालकांसाठी स्वतंत्र कक्ष होते. तपासणीसाठी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत विशिष्ट अंतर ठेवून रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील स्वत: लक्ष देत होते. डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. संदीप जोशी, डॉ. किरण बडगुजर, डॉ. नितीन पाटील, डॉ. जी.एम.पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. शेलकर यांनी तपासणी केली. प्रशासनाचे वतीने प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन आपापल्या परीने परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.